राष्ट्रवादीचे आमदार संजय (काका) पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची घोषणा मुंबईत करताच तासगाव शहरातील त्यांच्या समर्थकांनी ‘नई सोच, नई उम्मीद’ असा नारा देत फटाक्यांची आतषबाजी करून मंगळवारी जल्लोष केला. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रतीक पाटील आणि भाजपचे संजय (काका) पाटील असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
गृहमंत्री आर. आर. पाटील हेच राष्ट्रवादीच्या फुटीला जबाबदार असल्याचा आरोप करीत संजय पाटील यांनी पक्षत्याग करण्याची तयारी गेल्या चार महिन्यांपासून सुरू केली होती. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार बठकीत राज्याच्या गृह खात्याचे वाभाडे काढत त्यांनी आर. आर. पाटील यांना घेरण्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी संजय पाटील यांना त्याच वेळी नोटीसही बजावली होती. मात्र या नोटिशीला कोणताही प्रतिसाद न देता पाटील यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मुंबईत जाहीर केले.
जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव, जत, आटपाडी तालुक्यांतील नेत्यांनी दुष्काळी फोरमची स्थापना करून यापूर्वीच प्रस्थापितांविरुद्ध आघाडी उघडली आहे. या फोरममध्ये कवठेमहांकाळचे माजी आमदार अजित घोरपडे, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, जतचे विलासराव जगताप यांचा समावेश होता. संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत असणाऱ्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे असेच मानले जात आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील यांनीही लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधल्याचे सांगितले जात होते.
काँग्रेसच्या परंपरेनुसार सांगलीतील उमेदवारी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनाच सत्ताधारी काँग्रेसची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील व संजय (काका) पाटील असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. वसंतदादा घराण्याच्या तिसऱ्या पिढीकडे संसदेचे प्रतिनिधित्व सध्या असून प्रतीक पाटील हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असलेतरी गतनिवडणुकीत अपक्ष म्हणून मदानात उतरलेल्या अजित घोरपडे यांनी काँग्रेसचे मताधिक्य ३९ हजारांपर्यंत खाली आणले होते. लाखाच्या फरकाने विजय मिळवण्याची परंपरा असणाऱ्या दादा घराण्याला आता आत्मपरीक्षणाची वेळ आली तरी नवल नाही.
संजय (काका) पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताच तासगाव शहरात त्यांच्या समर्थकांनी मोटारसायकल रॅली काढून गावात जोरदार घोषणाबाजी केली. फटाक्यांची आतषबाजी करीत ‘नई सोच, नई उम्मीद’चे नारे दिले.
संजय पाटलांच्या भाजप प्रवेशाचे सांगलीत स्वागत!
राष्ट्रवादीचे आमदार संजय (काका) पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची घोषणा मुंबईत करताच तासगाव शहरातील त्यांच्या समर्थकांनी ‘नई सोच, नई उम्मीद’ असा नारा देत फटाक्यांची आतषबाजी करून मंगळवारी जल्लोष केला.
First published on: 26-02-2014 at 04:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome to sanjay patil entry in bjp