मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर कालबाह्य़ झालेल्या गाडय़ांची जागा घेण्यासाठी बंबार्डिअर कंपनीच्या नव्या गाडय़ा महिन्याभराच्या कालावधीनंतर का होईना, तयार असताना या गाडय़ांचा लाभ मध्य रेल्वेवरील ४०-४२ लाख प्रवाशांना मिळणारच नाही. बंबाíडअर गाडय़ा एसी विद्युतप्रवाहावर धावतात. मध्य रेल्वेवर अद्याप एसी विद्युतप्रवाहाचे काम पूर्ण न झाल्याने या गाडय़ा मध्य रेल्वेऐवजी पश्चिम रेल्वेच्या सेवेत येणार आहेत, तर पश्चिम रेल्वेवरील दहा वष्रे जुन्या सिमेन्स कंपनीच्या दोन गाडय़ा मध्य रेल्वेवर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही नव्या प्रकल्पाचा लाभ सर्वप्रथम पश्चिम उपनगरांतील लोकांना करून देण्याची सरकारची प्रथा रेल्वेने बंबार्डिअर गाडय़ांच्या बाबतीतही पाळली आहे.
मध्य रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनाचे काम तांत्रिकदृष्टय़ा पूर्ण झाले आहे, मात्र त्यालाही काही परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत. या कामासाठी कितीही अवधी लागू शकतो. उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या बंबाíडअर गाडय़ा पूर्णपणे एसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या आहेत. मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेवरील डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण होऊन दोन वष्रे उलटली आहेत. त्यामुळे या नव्या गाडय़ा पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात जाणार आहेत. सध्या या गाडय़ांपकी दोन गाडय़ाच पश्चिम रेल्वेमार्गावर धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात या दोन गाडय़ांची भर पडल्यानंतर या ताफ्यातील सिमेन्स किंवा एसी-डीसी अशा दोन्ही विद्युतप्रवाहांवर चालणाऱ्या गाडय़ांपकी दोन गाडय़ा मध्य रेल्वेकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन गाडय़ा वाढतील, असे सूत्रांतर्फे सांगण्यात येत आहे. मात्र मध्य रेल्वेवरील जुनाट आणि कालबाह्य़ झालेल्या दोन गाडय़ा मध्य रेल्वेने सेवेतून हद्दपार केल्यास मध्य रेल्वेला काहीच फायदा होणार नाही. मात्र मध्य रेल्वेवरील दोन गाडय़ा मोडीत काढल्या नाहीत, तर मध्य रेल्वेला काही प्रमाणात फायदा होणार आहे.
रेल्वेच्या कोणत्याही नव्या प्रकल्पाची सुरुवात मध्य रेल्वेऐवजी पश्चिम रेल्वेवरच करण्यात येते, असा टीकेचा सूर मध्य रेल्वेवरील प्रवाशांकडून नेहमीच लावला जातो. आता बंबार्डिअर गाडय़ांच्या पश्चिम रेल्वे प्रवेशामुळेही हेच सिद्ध होणार आहे. प्रवासी संख्येच्या बाबतीत मध्य रेल्वे पश्चिम रेल्वेपेक्षा वरचढ आहे. तरीही मध्य रेल्वेवरील प्रवाशांना अशी सापत्न वागणूक का, असा प्रश्न प्रवासी संघटना विचारत आहेत.

Story img Loader