उपनगरी गाडय़ांच्या वरिष्ठ गार्डना डावलून कनिष्ठ, अननुभवी गार्डना मेल/एक्स्प्रेसवर बढती देण्याच्या रेल्वे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या गार्डनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा संप झाल्यास पश्चिम रेल्वेची उपनगरी रेल्वे सेवा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
पश्चिम रेल्वेतील गार्डच्या विविध मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप ‘मुंबई गार्ड असोसिएशन’ने केला आहे. गार्डच्या रिक्त जागांचा अनुशेष, यामुळे पडणारा कामाचा ताण, साप्ताहिक सुटय़ांचा अभाव यामुळे उपनगरी रेल्वेच्या गार्डमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच रेल्वे प्रशासनाकडून गार्डवर कामाची सक्ती आणि मनमानी पद्धतीने बढत्या यामुळे गार्डमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पश्चिम रेल्वेवर राजधानीसह अनेक महत्त्वाच्या मेल/एक्स्प्रेस गाडय़ा चालविल्या जातात. या गाडय़ांवर अनुभवी गार्डची नियुक्ती करणे आवश्यक असते. उपनगरी गाडय़ांवर गार्ड म्हणून किमान २० वर्षे काम केल्यावर मेल/एक्स्प्रेस गाडय़ांवर गार्ड म्हणून नियुक्ती करण्यात येते. असे असूनही रेल्वे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी अनुभवी गार्डऐवजी कनिष्ठ आणि अननुभवी गार्डना मेल/एक्स्प्रेसवर नियुक्त केल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
गार्ड्सना पदोन्नती देताना मनमानी झाल्याबद्दल मुंबई गार्ड असोसिएशनने रेल्वे बोर्डाकडे पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अद्याप त्यावर उत्तर देण्यात आलेले नाही. या तसेच अन्य मागण्यांवर सामोपचाराने मार्ग निघाला नाही तर संप करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असेही असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा