अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी कबड्डी प्रीमीयर लीगची स्थापना होत आहे. याचदरम्यान माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मंडळाने पनवेलमध्ये मे महिन्यात लाखो रुपयांची रोख बक्षिसांची स्पर्धा आयोजित केली. मात्र कबड्डीच्या स्पर्धेतून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचे रूपांतर क्रीडापटूंच्या रोजीरोटीमध्ये होत नाही. मातीच्या खेळात सामान्य क्रीडा रसिकांची नजर कबड्डीपटूंच्या चढाई व पकडीत असते. रणसंग्रामानंतर मात्र हेच कबड्डीपटू कंत्राटीकाम मिळेल का, या दयेने अनेक कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर खेटे घालतात हेच आजचे न पचणारे सत्य आहे. सामन्यादरम्यान संघाचे नाव उंचावणाऱ्या कबड्डीपटूंचे सामन्यानंतरची ही बिकट अवस्था पाहायला मिळते. पनवेल तालुक्यातील कोयनावेळे हे पुनर्वसित गाव. परंतु या गावाची खरी ओळख वंशपरंपरागत असणारे कबड्डीपटूंचे गाव अशीच आहे. या गावातील तरुण कबड्डीपटूही आजही स्पर्धेनंतर कामाच्या आणि भविष्यात पुरस्कर्ता कंपन्यांच्या शोधात आहेत.
कोयना धरण प्रकल्पामधील कोयनावेळे हे तळोजा येथील एक पुनर्वसित गाव आहे. या गावामध्ये १९५९ नंतर ग्रामस्थ राहू लागले. काही मंडळी मुंबईकडे नोकरीनिमित्ताने गेली. परंतु हेच चाकरमानी कुटुंबाकडे कोयनावेळेत परतल्यावर मुलांसमोर कबड्डीचा सराव करायचे. या सरावादरम्यान गावातील तरुण या कबड्डीच्या खेळाकडे वळाला. गावाच्या ग्रामदेवतेच्या नावाने श्रीकेदारनाथ क्रीडा संघाच्या स्थापनेने श्रीगणेशा झाला. भौगोलिकदृष्टय़ा रायगड जिल्हा कबड्डी संघ अंतरामुळे दूर असल्याने श्री केदारनाथ संघाने मुंबई शहरकडे संघाची नोंदणी करणे पसंत केले. त्यापूर्वी रायगड जिल्ह्य़ात या संघाने आपले नावलौकिक कमावले होते. आठवणीला उजाळा देत गावातील जुनेजाणते अनंत कदम हे पेण तालुक्यातील झुंजार कणे, पेझारी, प्रतिज्ञा बांधण, पोयनाड, पनवेलची पारगाव आणि उरणची बेंडखळ अशा संघांमधील सामन्यांच्या चुरशीबाबत सांगतात. संघातील पहिल्या फळीतील दत्ता कदम, अनिल कदम, सुनील कदम, शशिकांत कदम, दिलीप कदम, दिलीप शिंदे, रघुनाथ कदम यांच्या पकडीचे व चढाईचे किस्से अजूनही कबड्डीप्रेमींमध्ये चर्चिले जातात. ज्येष्ठ कबड्डीपटूंना बँकेने, कस्टम आणि खासगी कंपन्यांनी पुरस्कृत केले. परंतु ज्यांचे नशीब फळले त्यांचे चांगभले, परंतु काही नजरेआड झाले. अनंत कदम हे याच नजरेआडांपैकीच एक होते. त्यांना कोणत्याही कंपन्यांनी मदतीचा हात दिला नाही. पर्यायी आज अनंत कदम हे वयाच्या ५९ वर्षी वेल्डिंगचे काम करून आपले कुटुंब चालवीत आहेत. वयाची २० वर्षे कबड्डीला देऊनही कदम यांची ही अवस्था झाली. कदमांसारखे अनेक कबड्डीपटू या गावात असेच खुंटले गेले. परंतु या गावातील जुन्या व भावी पिढीसमोरील कबड्डीप्रती आकर्षण कमी होण्याऐवजी वाढतच गेले. आजही गावात घराघरात कबड्डीत प्रावीण्य कमावणारे तरुण आहेत. सागर कदम, निखिल कदम, अक्षय कदम, विपुल चव्हाण, किरण कदम, शुभम कदम, ओमकार कदम, अमोल कदम यांसारखी १८ ते २३ वयोगटातील तरुण आहेत. यातील अनेकांनी राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळ दाखविला आहे. हे सर्व कबड्डीपटू स्पर्धा संपली की उदरनिर्वाहासाठी आजही कंत्राटी कामाच्या प्रतीक्षेत आहेत. या गावातील अक्षय कदम हा अभियांत्रिकी शिक्षण घेत असून, त्याने गावातील कबड्डीपटू पवन मोरे या तरुणाला आयडॉल मानून या खेळाकडे आकर्षित झाला आहे. पवन नुकताच मुंबई पोलीस दलात भरती झाला आहे. यामुळे प्रत्येक कबड्डीपटूला हा खेळाच आपले जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा आहे. परंतु दूपर्यंत आशेचे किरण या तरुणांना गवसत नाही. पोटात अन्न नाही आणि स्पर्धेत टाळ्या जिकणाऱ्या क्रीडापटूंची ही शोकांतिका आहे. माझा उत्तम खेळ कधी माझी हक्काची नोकरी माझ्या गावात माझ्या कुटुंबासमोर घेऊन येईल,
या प्रतीक्षेत कोयनावेळेचे हे कबड्डीपटू नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
कबड्डीची मुंबई व महाराष्ट्र संघटनेचे संकेतस्थळ आहे. येथे नवीन पुरस्कर्ता चाचणीविषयी जाहीर केली जाते. दुर्दैवाने २००८ पासून हे संकेतस्थळ अपडेट केलेले नाही. पनवेलच्या कबड्डीपट्टूंना मुंबई व रायगड जिल्हा हे दोन्ही क्रीडा असोशिएशन अंतराने दूर आहेत. पनवेल व उरणच्या संघांना नवी मुंबई क्रीडा असोसिएशन संघात नोंदणी झाल्यास किमान प्रवासाची डोकेदुखी कमी होईल.
पनवेल तालुक्यात हाकेच्या अंतरावर तळोजा औद्योगिक वसाहत आहे. यामध्ये अनेक नामांकित कंपन्या आहेत. या कंपन्यांनी पुढाकार घेऊन कबड्डीपट्टूंसाठी प्रोत्साहन देणे आज गरजेचे आहे. पुरस्कर्ता होणे शक्य नसल्यास नामांकित कंपन्यांनी कायमस्वरूपी नोकरी देऊन तरी क्रीडाक्षेत्रात हातभार लावणे गरजेचे आहे.
कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळेल, रोजीरोटीचे काय?
अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी कबड्डी प्रीमीयर लीगची स्थापना होत आहे.
First published on: 27-05-2014 at 07:12 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What about kabbadi players income