रेल्वे अंदाजपत्रकाबाबत प्रवाशांच्या तीव्र प्रतिक्रिया
यंदाच्या रेल्वे अंदाजपत्रकात पुण्याला चांगलाच ठेंगा दाखविण्यात आल्याने अनेक प्रवासी व प्रवासी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. देशाच्या इतर विभागाला नव्या गाडय़ा किंवा विकासासाठी निधी उपलब्ध होत असताना रेल्वे मंत्रालयाकडून पुणे विभागालाच का डावलले जाते, असा मुद्दा उपस्थित करून याबाबत पुणे विभागातील खासदार नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे विभागासाठी त्याचप्रमाणे पुणे शहराच्या दृष्टीने रेल्वेकडे प्रवाशांच्या विविध मागण्या आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेच्या पुणे विभागाकडूनही विविध गोष्टींबाबत रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, विकासकामांसाठी निधी किंवा कोणतीही नवी गाडी पुण्यासाठी सुरू झालेली नसल्याने पुणेकरांसाठी हे रेल्वे अंदाजपत्रक निराशाजनक असल्याची भावनाही व्यक्त होत आहे. त्याबाबतच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
कन्नुभाई त्रिवेदी (पुणे प्रवासी संघ)- पुणे विभागातील मागण्यांचा विचार झालेला नाही. पुणे-लोणावळा मार्गाचा विस्तार, पुणे-दौंड-मनमाड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम तातडीने मार्गी लावणे आदींबाबत काहीही उल्लेख नाही. हे अंदाजपत्रक केवळ पैसा काढून घेणारे आहे. मुंबई व उर्वरित राज्यालाही काही मिळाले नाही. आपल्या खासदारांनी त्यासाठी काहीही प्रयत्न केले नसल्याचे दिसते आहे.
माणिक बिर्ला- प्रवाशांना अनेक आधुनिक सुविधा मिळण्यासाठी रेल्वेने मोठय़ा खुबीने केलेल्या दरवाढीचे जनतेने सकारात्मक स्वागत केले पाहिजे. त्यातून समाधानकारक सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. नव्या दुरांतो गाडय़ा किंवा त्यांचा विस्तार झालेला नाही. रेल्वे अंदाजपत्रकात महाराष्ट्र व पुण्यासाठी काही विशेष मिळाले नाही. याबाबत खासदारांनी आपले वजन वापरले असते, तर काहीतरी पदरात पडले असते.
हर्षां शहा (रेल्वे प्रवासी ग्रुप)- दुरांतो गाडय़ा रोज करण्याची गरज आहे. चेन्नई, बंगळुरू, जयपूर आदी गाडय़ांबरोबर कोकणमार्गे तसेच सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, लातूरसाठी गाडय़ा हव्या होत्या. पुणे स्थानक फर्स्ट क्लास करण्यासाठीही निधी नाही. पुणे-मुंबई मार्गाच्या विस्तारीकरणाचीही योजना नाही. अर्थातच पुण्याला काहीही मिळाले नाही. त्याचे कारण जाहीर झाले पाहिजे. ई-तिकिटिंगची वेळ वाढवली, पण त्यातून काळाबाजार वाढेल. सामान्य माणसाला तिकिटे मिळणार नाहीत.
 चांदमल परमार- रेल्वे अंदाजपत्रकात पुण्याला काहीही दिले नाही. लोकलसाठी वेगळे टर्मिनन्स, लोणावळ्यासाठी तिसरी लेन, पुणे-दौंड-मनमाड, पुणे-कोल्हापूरसाठी दुसरी लेन व विद्युतीकरणाबाबत काहीही नाही.
हेमंत टपाले (पुणे-मुंबई प्रवासी संघ)- अधिभाराच्या नावाखाली सर्वसाधारण प्रवाशाला खिशाला छुप्या पद्धतीने कात्री लावण्यात आली आहे. पुणे विभागात प्रवाशांच्या अनेक मागण्या होत्या. उपनगरीय वाहतुकीचा विस्तार करण्याची योजना त्याचप्रमाणे विविध मार्गाचे दुहेरीकरण आदी महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुण्यातून रेल्वेला मोठे उत्पन्न असतानाही हे प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित केले आहेत.
मोहन मते (माजी सदस्य, रेल्वे सल्लागार समिती) – पुणे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची योजना आहे. पण, त्याबाबत कोणतीही कारवाई किंवा तरतूद नाही. थेट भाडेवाढ नाही, पण मागच्या दाराने प्रवाशांचे पैसे काढून घेण्यात येणार आहेत. एकूणच रेल्वे अर्थसंकल्पाने पुणेकरांची निराशाच झाली आहे.
प्रवीण चोरबेले (अध्यक्ष, शहर भाजप व्यापारी आघाडी)- रेल्वेमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे पुणेकरांना काही न देता पुणेकरांच्या विरोधात हे अंदाजपत्रक सादर केले आहे. मालवाहतुकीवर इंधन अधिभार लावल्याने रेल्वेने येणारा माल महागणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी आहे.

Story img Loader