जगात पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार मानला जातो. एवढेच नव्हे आर्थ्रिस्ट फाऊंडेशनने संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी पोहण्याची शिफारस केली आहे. आपल्याकडे पैसे देऊन शिबिरात पोहणे शिकण्याचा प्रकार अलीकडचा. त्यापूर्वी नदी, विहीर, तलाव या ठिकाणी सहज पोहण्याचे धडे वाडवडिलांकडून मिळायचे. एकदा पाण्यात पडले की पोहायला येते ही जुनी म्हण कदाचित त्याचमुळेच पडली असावी. पोहणे शिकायचे, पण अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
शहरीकरणामुळे नैसर्गिक साधने बंद होऊन त्याची जागा कृत्रिमरित्या बांधलेल्या जलतरण तलावांनी घेतली. पोहायला जाणे हल्ली प्रतिष्ठेचे समजले जाते. उन्हाळी शिबिरांमध्ये योग, प्राणायाम, कराटे, मुष्टियुद्ध, चित्रकला, तायकांडो, स्केटिंगची शिबिरे आयोजित केली जातात. त्यास पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. मुलांना वेगवेगळी व्यक्तिमत्त्व विकासाची शिबिरे करायला लावली की चांगले व्यक्तिमत्त्व घडते या भाबडय़ा आशेने पालक शिबिराच्या ठिकाणी गर्दी करतात.
उन्हाळा आला की या जलतरण तलावांना सुगीचे दिवस येतात. वर्षभर धूळ आणि घाणीने माखलेला हा तलाव स्वच्छ करून त्यात निळेनिळे पाणी दिसायला लागते. पुरुष, महिला आणि मुलांचा तासातासांचा गलका पोहण्यासाठी अतूर असतो. रात्री दहा वाजेपर्यंत पोहण्याच्या आणि पोहणाऱ्यांच्या विविध लीलांचा हा जलतरण तलाव उन्हाळाभर साक्षीदार असतो. तसाच तो लहानमोठय़ा अपघातांनाही आमंत्रण देत असल्याने उत्साही पालकांनी त्यापासून सावधान राहायला हवे. अशीच एक घटना नुकतीच उत्तर अंबाझरी मार्गावरील रवींद्रनाथ टागोर आर्ट गॅलरीच्या जवळच्या एनआयटी जलतरण तलावात घडली. ईशान कडू या पाच वषार्ंच्या मुलाला त्याच्या पालकांनी हौशेने पोहण्याच्या शिबिरात घातले. ईशान दाभ्याच्या सांदीपनी शाळेचा विद्यार्थी आहे. वाडी भागात राहणाऱ्या ईशानच्या पालकांनी नेहमीप्रमाणे त्याला पोहण्याच्या वर्गासाठी मंगळवारी सकाळी सहा वाजता एनआयटी जलतरण तलावावर आणले. तलावात प्रवेश करण्यापूर्वी कपडे बदलून तो बाहेर आला आणि त्याने थेट मोठय़ा माणसांसाठी असलेल्या तलावात उडी घेतली. त्याच्या आईच्याही ते लक्षात आले नाही. एका मुलाने उडी घेतल्याचे तेथील उपस्थितांपैकी काहींच्या लक्षात आले आणि त्यांनी आरडाओरड केल्याने लागलीच त्याला पाण्यातून काढण्यात आले. मात्र, तो बेशुद्धावस्थेत होता. तलाव प्रशासनाने त्याला जवळच्याच वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मंगळवार सकाळपासून तो बेशुद्ध अवस्थेत होता. तेथेच त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला. ईशान बेशुद्धावस्थेतून बाहेर येईल की नाही याविषयी डॉक्टरही साशंक होते. २५ तासानंतर आज सकाळी आई-आई करीत तो रडतच उठला. त्याचे दात ओठात घुसल्याने रक्त येत होते. या घटनेचे साक्षीदार असलेले नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. लिहितकर कुटुंबीयांनी ईशानच्या पालकांना मदत केली. अशी किंवा इतरही प्रकारची घटना घडू नये म्हणून पोहणे शिकताना जरा जपून राहणे म्हणजेच काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा