एकाच खोलीत शंभरावर मुली कोंबलेल्या स्थितीत, सकाळी वर्गखोली म्हणून त्याच खोलीचा वापर, कॅलेंडर नाही, घडय़ाळ नाही, पंख्यांचा तर प्रश्नच नाही. केवळ एका सीएफएल लाईटचा उजेड, लोडशेडिंगच्या वेळी एकच दिवा, स्वच्छतागृह न वापरण्याजोगे, मेळघाटातील अनेक आश्रमशाळांची ही अवस्था आहे. ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या विद्यार्थ्यांना मेळघाटातील आश्रमशाळांची पाहणी करताना असे अनेक धक्के बसत गेले.
मेळघाटात आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळांची व्यवस्था करण्यात आली खरी, पण या आश्रमशाळांना कोंडवाडय़ांपेक्षा वेगळे स्वरूप नाही. आम्हाला यातून बाहेर काढा, हाच येथील शाळकरी मुलांचा टाहो आहे. ‘टीआयएसएस’च्या तुळजापूर येथील ‘स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट’च्या विद्यार्थ्यांनी मेळघाटातील काही आश्रमशाळांना भेट दिली. त्यांच्या अहवालात अनेक धक्कादायक निरीक्षणे आहेत. आश्रमशाळांमधील मुलांना मोफत आहार आणि कपडय़ांचा पुरवठा केला जातो, पण अनेक आश्रमशाळांमध्ये मुलांना गणवेश मिळालेले नाहीत. हिवाळा संपण्याच्या बेतात असताना अजूनही सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर्सचे वाटप झालेले नाही. आहाराविषयी अनेक तक्रारी आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्वचारोगाची लागण झाली आहे. स्वच्छतागृहे आहेत, पण त्यांचा वापर केला जात नाही, सोलर वॉटर हिटर्स आणि जनरेटर्स तर नावालाच आहेत. मुलांचे भवितव्य घडवणाऱ्या या संस्थांमधील दारिद्रय़ सरकारी आहे की, सरकारी यंत्रणांचे, असा प्रश्न अहवालात उपस्थित करण्यात आला आहे.
रायपूर येथील आश्रमशाळेला या विद्यार्थ्यांनी भेट दिली तेव्हा दर्शनी रंगरंगोटी केलेली इमारत पाहून त्यांना आनंद झाला, पण हा क्षणभरच टिकला. आतमध्ये पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेचा अभाव होता. सुमारे १०० मुले त्या दिवशी गैरहजर होती. एकाच खोलीत १०३ मुली होत्या. जी खोली झोपण्यासाठी तीच सकाळी वर्गखोली म्हणून वापरण्याचा प्रकार त्यांना दिसला. दहा-बारा वर्षे याच ठिकाणी त्यांना व्यतीत करायचे आहे. पाण्यासाठी एकच हातपंप तोही गावाबाहेर आहे. आश्रमशाळेला पाणी पुरवण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्चून विहीर खोदण्यात आली. त्यावर पंप बसवण्यात आला, पण ही विहीर आता डासांचे उत्पादन केंद्र बनली आहे. सोलर वॉटर हिटर आणि जनरेटर बंद आहेत. स्वच्छतागृहावर पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे, पण त्याला नळच जोडलेले नाहीत. तोटय़ा आहेत, पण पाणी नाही. शौचासाठी उघडय़ावर जाणे अपरिहार्य आहे. गणवेश मिळालेले नाहीत. काहींना तर स्वेटर्सही मिळालेले नाहीत. थंडीत कुडकुडणे त्यांच्या नशिबी आहे.
बिजुधावडीच्या आश्रमशाळेचीही स्थिती याहून वेगळी नाही. या ठिकाणी मुलांना पुरेसा आहारही मिळत नाही. दररोज ५० ग्रॅम भात, १०० ग्रॅम भाजी, पोळी आणि महिन्यातून एकदा १०० ग्रॅम मासाहारी भाजी देण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. आश्रमशाळेच्या मागे बिस्किटांचे पुडे फेकलेले आढळले. ही बिस्किटे चवीला चांगली नाहीत, ही मुलांची तक्रार होती.
आश्रमशाळेत टय़ूबलाईट नाहीत. बारावीपर्यंत शिकण्याची सोय आहे, पण शाळेत प्रयोगशाळा, उपकरणे नाहीत. वाचनालय म्हणजे काय, असाच प्रश्न समोर. मुलींना तर आंघोळीसाठी नदीवर जाण्याचाच एकमेव पर्याय. पायाभूत सुविधांच्या अभावात मेळघाटातील आश्रमशाळांमधून आदिवासी मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळेल आणि त्यांचे भवितव्य कसे घडेल, याची चिंता सरकारला आहे का, असाच प्रश्न या आश्रमशाळांना  भेट   देताना  पडतो,   असे मत   या   अहवालात नोंदवण्यात आले आहे.     (समाप्त)