दोन दिवसांपूर्वी म्हणे ‘खिलाडी’ चुलबुल पांम्डेला भेटण्यासाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर गेला होता. सध्या पांडेजींचा ‘दबंग २’ प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याने जो तो पांडेजींना वेळात वेळ काढून भेट देतो आहे. तिकडे बाजीराव ‘सिंघम’लाही आपल्या आगामी ‘हिंमतवाला’साठी पुन्हा एकदा सिंघम स्टाइलच काहीतरी हवे आहे. राजकुमार हिरानींनी भलेही मुन्नाभाईचा विचार सोडून दिला असेल पण, प्रेक्षक मात्र अजूनही मुन्नाभाईच्या प्रेमात आहेत. चित्रपटवेडय़ा कुटुंबातील सदस्यांना ‘खिलाडी’, ‘मुन्नाभाई’, ‘पांडेजी’, ‘सिंघम’ ही नावे आता नवीन राहिलेली नाहीत. किंबहुना बॉलिवूडचे कलाकारही या आपल्या फिल्मी व्यक्तिरेखांवर इतके खूश आहेत की त्यांना त्या प्रतिमेतून बाहेरच पडायचे नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अभिनय सम्राट’ दिलीप कुमार, ‘एव्हरग्रीन’ देवआनंद, ‘सदाबहार’ राजेश खन्ना, ‘जंपिंग जॅक’ जितेंद्र, ‘अॅंग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन अशी कितीतरी विशेषणे नायकांना चिकटली. पण, त्यांच्यापैकी कोणीही व्यक्तिरेखेच्या नावाने लोकप्रिय झाले नव्हते. अपवाद होता तो खलनायकांचा. ‘गब्बर’ म्हटल्यावर अमजद खानच डोळ्यासमोर येतो. अमरीश पुरी यांनी रंगवलेला लोकप्रिय खलनायक कोणता?, असे विचारले तर आपल्याला ‘मोगॅम्बो खूश हुआ’ आठवतोच.
१९८७ साली आलेल्या ‘मिस्टर इंडिया’मुळे अनिल कपूरला ती ओळख चिकटली ती कायमचीच. आजही त्याचा उल्लेख ‘मिस्टर इंडिया’ असाच केला जातो. सध्याचे क लाकार आपली प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा ज्या भूमिकेमुळे आपल्याला लोकप्रियता मिळाली आहे ती भूमिका जपण्याचा किंवा पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. गेली अनेक वर्ष सूरज बडजात्यांच्या चित्रपटांसाठी सलमान खान ‘प्रेम’ होता तर यश चोप्रांच्या चित्रपटांसाठी शाहरूख ‘राहुल’ होता. ‘दबंग’मधीलचुलबुल पांडेने सलमानची प्रेमभरी प्रतिमा मोडली. आता सलमान स्वत:च चुलबुल पांडेच्या प्रेमात आहे. त्यामुळे अगदी उत्पादनांच्या जाहिरातीतही त्याची पांडेजी ही ओळख कायम ठेवली गेली आहे.
अक्षय कुमारचा ‘खिलाडी’ इतका यशस्वी झाला की त्याने ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’ असे अनेक चित्रपट दिले. आता आलेला ‘खिलाडी ७८६’ हा त्याचा या मालिकेतला पाचवा चित्रपट आहे. तीच गोष्ट अजय देवगणची. रांगडा बाजीराव सिंघम लोकांना इतका आवडला की आता आपल्या प्रत्येक चित्रपटात ‘सिंघम’ची प्रतिमा कायम राहिल, यावर अजय भर देतो आहे. आमिर खान प्रत्येक चित्रपटात जाणीवपूर्वक वेगळी भूमिका करतो. मात्र, ‘गजनी’मध्ये स्मृतिभ्रंश झालेला त्याचा नायक एवढा गाजला की कोणी एखादी गोष्ट विसरला असेल तर त्याला तुझा ‘गजनी’ झाला का रे?, असे विचारले जाते. नावाचा हा महिमा आता नायकांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. ‘कॉकटेल’ चित्रपटातली दीपिका पदुकोणने साकारलेल्या मनमौजी वेरोनिकाला चांगलीच दाद मिळाली. मध्यंतरी एका हॉटेलमध्ये गेलेल्या दीपिकाला प्रत्येकजण वेरोनिका नावाने हाक मारत होता. त्यामुळे आपल्या मूळ नावांपेक्षा चित्रपटातील नावांची जादू कायम रहावी, यासाठी हे कलाकार धडपड करताना दिसत आहेत.
चुलबुल पांडे, सिंघम, खिलाडी.. नावात काय जादू आहे?
दोन दिवसांपूर्वी म्हणे ‘खिलाडी’ चुलबुल पांम्डेला भेटण्यासाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर गेला होता. सध्या पांडेजींचा ‘दबंग २’ प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याने जो तो पांडेजींना वेळात वेळ काढून भेट देतो आहे. तिकडे बाजीराव ‘सिंघम’लाही आपल्या आगामी ‘हिंमतवाला’साठी पुन्हा एकदा सिंघम स्टाइलच काहीतरी हवे आहे.
First published on: 08-12-2012 at 01:27 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is magic in name like chulbul pande singham khiladi