सलग दोन महिन्यांपासून गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या सटाणा तालुक्यातील वातावरणाच्या स्थितीने सर्वाना बुचकळ्यात टाकले आहे. या एकाच भागात वारंवार गारपीट व अवकाळी पाऊस होण्यामागे नेमके काय कारण असावे, याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. हवामानशास्त्र विभागाने या गारपिटीमागे तापमान जलदगतीने खाली येण्याचा अंदाज वर्तविला आहे, तर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरडवाहू जमीन असलेल्या भागात गारपीट होत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. हवामानाचे हे अंदाज लक्षात घेतल्यास एकटय़ा याच तालुक्यात उंचावलेले तापमान झपाटय़ाने खाली कसे येते आणि तालुक्यात बहुतांश क्षेत्र हिरवाईने नटलेले असताना हे संकट का कोसळते, असे काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी पुन्हा गारपिटीसह झालेल्या पावसाने सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्टय़ात शेतीचे नुकसान झाले. चौंधाणे, निकवेल, कंधाणे व मिरपूर गावात प्रारंभी काही काळ गारपीट झाली. त्यानंतर सुमारे तासभर वादळीवाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी कांदा काढणीचे काम सुरू आहे. काढून खळ्यात ठेवलेला कांदा पावसात भिजला. डाळिंबाचा हा फळधारणा होण्याचा कालावधी असतो. अशा डाळिंब बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सलग दोन महिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात सटाणा तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. काही विशिष्ट दिवसांच्या अंतराने कोसळणाऱ्या या संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. स्थानिक पातळीवरील वातावरणात असे नेमके काय घडते की, या एकाच भागात सातत्याने गारपीट व अवकाळी पाऊस कोसळतो, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सोमवारी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कमालीचा उकाडा जाणवत होता. बहुतांश भागातील तापमान ४० अंशावर पोहोचले असताना सटाणावगळता कुठेही रिमझिम पावसाची नोंद झाली नाही.
पाऊस व गारपीट याची शास्त्रीय कारणे लक्षात घेणे आवश्यक आहे. ढगाचे मुख्य तीन प्रकार आहेत. कमी उंचीवरील, मध्यम उंचीवरील व अती उंचीवरील असे प्रकार असून त्यांचे पुढे काही उपप्रकार पडतात. कमी व मध्यम उंचीवरील ढगांमुळे प्रामुख्याने पाऊस पडतो. वातावरणात जेव्हा ‘सीबी’ या उपप्रकाराचे काळेभोर ढग तयार होतात, तेव्हा गारपीट होते.
तत्पूर्वी, तापमानाची पातळी वेगाने खाली येते. यावेळी ढगांमधील पाण्याचे हिमकण तयार होतात. पुढे त्यांच्या गुच्छाद्वारे गार तयार होते. तेव्हा ढगांमधून पाऊस पडण्याऐवजी गारा पडू लागतात, असे हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेचे संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात हवामानाचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागांना गारपिटीचा सामना करावा लागला. त्यावेळी कोकण पट्टय़ात कुठेही गारपीट झाली नाही. ज्या भागात गारपीट झाली, त्यातील काही परिसर कोरडवाहू होता. हिरवाईने नटलेल्या कोकण परिसरात गारपिटीची नोंद झाली नसल्याचा दाखला त्यांनी दिला. सटाणा परिसरातील गारपिटीला ही बाब कारणीभूत असू शकेल असा या तज्ज्ञांचा अंदाज आहे.
गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या सटाणा तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र नगण्य आहे. बहुतांश परिसर डाळिंब बागांच्या हिरवाईने समृद्ध झालेला आहे. यामुळे तज्ज्ञांचा अंदाजाचा निकष या ठिकाणी कसा लावता येईल.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाचा विचार केल्यास केवळ सटाणा तालुक्यात तापमान कसे कमी होते, उर्वरित जिल्ह्यात तशी स्थिती कुठेही निर्माण होत नाही काय, असा प्रश्नही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जलदगतीने कमी होणारे तापमान गारपिटीला कारक
नाशिकमध्ये व प्रामुख्याने सटाणा तालुक्यात वारंवार गारपीट व अवकाळी पाऊस होण्यामागे झपाटय़ाने कमी होणारे तापमान हे मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात तापमान लवकर कमी होते. त्यामुळे ढगांतील पाण्याचे हिमकण तयार होतात. ही स्थिती गारपिटीस कारक ठरते.
-व्ही. के. सातव,
संचालक, मुंबई वेधशाळा,
हवामानशास्त्र विभाग