हल्ली असुरक्षेची भावना कायमच प्रत्येकाच्या मनात असतेच. संकटं कुठल्याही रूपात समोर उभी ठाकतात. अशा प्रसंगी पोलीस किंवा संबंधित यंत्रणांची गरज लागते. पण नेमके जायचे कुठे, कुणाकडे तक्रार करायची याची कल्पना नसते. मग आपण माहीत असेल तो फोन फिरवू लागतो. मात्र अनेकदा योग्य क्रमांक मिळेपर्यंत वेळ गेलेली असते. पण आता मुंबई पोलिसांनी अनेक हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. त्यांचे क्रमांक आपण सेव्ह केले तर संकटात वेळेवर मदत मिळू शकेल. काही अत्यंत उपयोगी क्रमांकांची ही थोडक्यात माहिती-
डायल १००
हा क्रमांक प्रत्येकालाच तोंडपाठ आहे. याचा नियंत्रण कक्ष मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात आहे. त्याच्या एकूण २६ लाइन्स आहेत. १०० क्रमांकावर आलेला फोन या नियंत्रण कक्षातून मग संबंधित पोलीस ठाण्याला कळवला जातो.
महिलांसाठी हेल्पलाइन १०३
महिलांच्या सुरक्षेसाठी १०३ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी १०९०
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी १०९० क्रमांकाची हेल्पलाइन आहे. १२९३ हा सुद्धा हेल्पलाइन क्रमांक असून तो फक्त एमटीएमएन आणि बीएसएनएलच्या फोनवरून लागतो. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यासाठी प्रामुख्याने ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यासाठी विशेष पोलीस पथके आणि गस्तीवरील गाडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत.
प्रवासादरम्यानचा क्रमांक
५ जानेवारी २०१४ रोजी कुर्ला टर्मिनस स्थानकात उतरलेली एक मुलगी इस्थर अनुया बेपत्ता झाली आणि पाच दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. एका टॅक्सीचालकाने तिला घरी सोडण्याच्या निमित्ताने आपल्या बाईकवर नेऊन नंतर तिची हत्या केली होती. या प्रकरणाचा उलगडा करता करता पोलिसांची दमछाक झाली होती. प्रवासादरम्यान एकटी तरुणी असुरक्षित असते. त्यामुळे तिच्या सुरक्षेसाठी ९९६९७७७८८८ या क्रमांकाची हेल्पलाइन या घटनेनंतर सुरू झाली. एखादी महिला एकटी असेल आणि प्रवासानिमित्त रिक्षा किंवा टॅक्सीत बसली तर तिने त्या संबंधित टॅक्सीचा/रिक्षाचा क्रमांक फक्त या हेल्पलाइनवर मेसेज करायचा. जेणेकरून तो क्रमांक विशेष सॉफ्टवेअरच्या आधारे सेव्ह राहील आणि काही प्रसंग आला तर त्या महिलेला मदत मिळू शकेल.
एसएमएस
अनेकदा आपण अनेकदा काही चुकीचे घडताना पाहतो. आपल्या पोलीस ठाण्यात जायचे नसते किंवा आपले नावही उघड होऊ द्यायचे नसते. अशावेळी ७७३८१३३१४४ आणि ७७३८१४४१४४ या क्रमांकांवर फक्त एसएमएस करायचे. आपला एसएमएस गेल्यावर लगेच तो मेसेज संबधित ठिकाणी पाठवून कारवाई केली जाते. काय कारवाई केली जाते ते तक्रारदाराला नंतर कळवले जाते. प्रत्येक एसएमएसवर काय कारवाई झाली त्याचा अहवाल पोलीस उपायुक्त घेत असतात.
पासपोर्ट
पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाणी विशेष शाखेशी संगणकाने जोडली आहेत. आपल्या पारपत्राच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ७७१५८०४००० हा क्रमांक आहे.
सायबर हेल्पलाइन
बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. स्मार्टफोनवर इंटरनेट आणि त्याद्वारे सोशल नेटवर्किंगचा वापर सर्रास होतो. पण त्यामुळे त्याचा गैरवापरही वाढला आहे. सोशल नेटवर्किग साइटवर बदनामीकारक मजकूर टाकले जातात. त्यासाठी ९८२०८१०००७ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या सायबर सेलमधून ही सेवा नियंत्रित केली जाते.
रेल्वेत काही हरवले तर..
रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा सामान विसरले जाते. त्यासाठी ९८३३३३११११ ही हेल्पलाइन मदतीला येते. मुंबईसह राज्यभरात या हेल्पलाइनचा वापर होतो. रेल्वेच्या महासंचालक कार्यालयात त्यासाठी कक्ष उभारण्यात आला असून प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्यात स्वतंत्र मोबाईल पुरविण्यात आले आहेत.
प्रत्येक गुन्ह्य़ाचे आणि संकटाचे स्वरूप लक्षात घेऊन या हेल्पलाइन तयार केल्या आहेत. त्यामुळे या विशिष्ट कामासाठी त्याच हेल्पलाइनशी संपर्क केल्यास मदत देणे सोपे होईल, असे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड (अभियान) यांनी सांगितले. आपल्या फोनवर हे क्रमांक कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवावेत, असे आवाहन मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. आपण जेथे राहतो त्या संबंधित पोलीस ठाण्याचे दोन क्रमांकही प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत, असेही ते म्हणाले.
संकट आल्यावर काय कराल..?
हल्ली असुरक्षेची भावना कायमच प्रत्येकाच्या मनात असतेच. संकटं कुठल्याही रूपात समोर उभी ठाकतात.
आणखी वाचा
First published on: 16-09-2014 at 06:33 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What u will do if u r in danger