बुधवारची सकाळ मुंबईतल्या अनेक समलिंगी जोडप्याजोडप्यांसाठी आशेचा किरण घेऊन उजाडली. समलिंगी संबंधांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सकाळी निकाल जाहीर होणार असल्याने आपल्या बाजूने निकाल लागेल, या आशेने अनेक जण आनंद साजरा करण्यासाठी आझाद मैदानात जमले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, पण तो विरोधात गेल्याने या सर्वाचाच उत्साह मावळला. जल्लोष करण्यासाठी वळलेल्या हाताच्या मुठी त्वेषाने विरोधाच्या घोषणा देण्यासाठी उठल्या आणि आझाद मैदान परिसर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा निषेध करणाऱ्या घोषणांनी दणाणून गेला. ‘अपराध’ माझा असा काय झाला? अशीच त्यांची भावना होती.  
‘बॉम्बे गे’सारख्या अनेक संस्थांचे कार्यकर्ते आझाद मैदानात जल्लोष करण्यासाठी जवळपास ६०-७० जण बुधवारी जमले होते. यात समलिंगी संबंध असलेल्या महिलांचाही समावेश होता. दिल्ली उच्च न्यायलयाने ३७७ व्या कलमाबाबतचानिकाल आपल्या बाजूने दिल्याने सर्वोच्च न्यायालयातही आपलाच विजय होईल, अशी त्यांच्यापैकी प्रत्येकाची खात्री होती. मात्र, समलिंगी संबंध म्हणजे कायद्याने अपराधच असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाला आणि या सर्वाना कमालीचा धक्का बसला. आमचे ‘सेक्शुअल ओरिएण्टेशन’ हा मुद्दा आम्हाला दुय्यम नागरिक किंवा गुन्हेगार कसे ठरवू शकतो, असा प्रश्न ते उपस्थित करत होते. सज्ञान असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार कायद्यानेच सर्वाना दिला आहे. मग आमच्या अधिकारांची पायामल्ली का, असेही प्रश्न विचारले जात होते. इतर नागरिकांप्रमाणेच आम्हाला गर्वाने आणि मान वर करून जगता आले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल आम्ही वाचलेला नाही. पण आम्हाला कायदेशीर मान्यता मिळेपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत, असे ‘बॉम्बे गे’ या संस्थेच्या सचिन जैन यांनी सांगितले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालामुळे अनेकांनी पुढे येत आपल्याला समलिंगी संबंधांचे आकर्षण वाटते, असे सांगण्याचे धाडस केले होते. दुसऱ्यांची फसवणूक करून जगण्यापेक्षा आपण आहोत तसे जगण्याचा प्रयत्न हे लोक करत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्ही सर्वच अपराधी ठरलो आहोत. हे आम्हाला मान्य नाही. आमच्या पुढील लढय़ाची दिशा लवकरच निश्चित होईल, असे नक्षत्र बागवे म्हणाले. आम्हाला समान लिंगाच्या व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण खूप मनापासून वाटते. निसर्गत:च आम्हाला या व्यक्ती आवडत असतात. त्यामुळे त्यात अनैसर्गिक असे काही असूच शकत नाही. मग आमचा अपराध नेमका काय, असा प्रश्न या सर्वातर्फे विचारला जात होता.

Story img Loader