नवी मुंबई शिवसेनेत सध्या व्हॉट्स अॅप वॉर सुरू झाले असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि युवा सेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या सर्मथकांमध्ये शिवीगाळ, हमरीतुमरी सुरू झाली आहे. यात वैभव नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याचा प्रचार केला जात असल्याने चौगुले समर्थक चांगलेच बिथरले आहेत. यात गाववाला आणि बाहेरचा अशा वादाचा एक रंगदेखील निर्माण केला जात आहे.
नवी मुंबईत राजकीय रंगांची उधळण सुरू झाली आहे. कार्यक्रम, ओल्या पाटर्य़ा, यातून हा कलगी-तुरा दिसू लागला आहे. नवी मुंबईत ऐरोली आणि बेलापूर असे दोन मतदारसंघ असून शिवसैनिकांनी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवाऱ्या जाहीर करून टाकल्या आहेत. यात ऐरोली मतदारसंघात जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचा पहिल्यापासून दावा असून मागील निवडणुकीत ते बारा हजार मतांनी पराजित झालेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला असलेले अनुकूल वातावरण, मोदी फॅक्टर, प्रस्थापितांच्या विरोधातील नाराजी यांसारख्या कारणांमुळे चौगुले यांना विजयाची खात्री झाली आहे.
दोन महिन्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चौगुले यांनी सध्या सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. असे सर्व वातावरण असतानाच वैभव नाईक यांना उमेदवारी मिळाल्याचा प्रचार केला जात असून यात नाईक सर्मथकांचा मोठा सहभाग आहे.
सध्या एका शिवसैनिकाने शिवसेना सायबर ग्रुप तयार केला असून त्यावर नाईक यांचा प्रचार केला जात आहे. यावर एका उत्साही तरुणाने चौगुले यांना आपण ओळखत नसून वैभवशेठ हेच आमदारकीचे दावेदार असल्याचे म्हटले होते. त्यावर ऐरोलीतील शिवसैनिकांनी त्या तरुणाला ऐरोलीत येण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळले असून याला नाईक विरुद्ध चौगुले, ग्रामस्थ विरुद्ध बाहेरचे, कोपरखैरणे विरुद्ध ऐरोली असे रंग चढू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा