विदर्भात अतिवृष्टीमुळे यंदा कहर केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ हजार ९३५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली, पण दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या हाती मदत न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. दोन वर्षांपूर्वी अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई या महिन्यात शेतकऱ्यांना मिळाली. आता ही मदत केव्हा मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जून आणि जुलैमध्ये संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. भरीस भर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही अतिपावसाने अनेक भागात शेती उध्वस्त झाली. नुकसानीचे सर्वेक्षण आणि त्याचे अहवाल सरकापर्यंत पोहोचण्यात बराच वेळ गेला. सप्टेंबर महिना उजाडण्यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असे सांगण्यात येत होते, पण घरांची पडझड, मृतांच्या कुटुंबीयांना तात्पुरती मदत आणि पशुपालकांना सहाय्य, ही मलमपट्टी वगळता शेतकऱ्यांच्या हाती छदामही आलेला नाही.
विदर्भात सुमारे २ हजार कोटी रुपयांची पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. अमरावती विभागात जून आणि जुलैमध्ये ८ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणादरम्यान निदर्शनास आले होते. सुमारे ४५ हजार घरांची पूर्णत: अथवा अंशत: पडझड झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयात संकलित करण्यात आलेल्या अहवालात नमूद आहे, पण शेतकऱ्यांना मदतीच्या बाबतीत जे धोरण ठरवण्यात आले त्यात ज्या शेतकऱ्यांचे पन्नास टक्क्यांवर नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनाच मदत दिली जाईल, हे स्पष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांना धक्का बसला. विभागीय आयुक्त कार्यालयातून एकत्रित अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला. त्यात ४ लाख ८८ हजार १९७ हेक्टरमध्ये पीकहानी झाल्याचे नमूद आहे. अध्र्या अधिक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
विदर्भात अतिवृष्टीमुळे १०७ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. पक्क्या घरांच्या नुकसानीसाठी ७० हजार रुपये, कच्च्या घरांच्या पडझडीसाठी २५ हजार, तर अंशत: नुकसान झालेल्या घरांसाठी १५ हजार रुपयांची मदत आहे. वाहून गेलेल्या शेतजमिनीसाठी प्रती हेक्टरी २५ हजार रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी २० हजार रुपये, धान पिकाच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी ७ हजार रुपये आणि इतर पिकांसाठी ५ हजार रुपये मदतीचे निकष आहेत. एकीकडे उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढलेला असताना ही मदत अत्यंत तोकडी असल्याचा सूर उमटला होता.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर विदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही भेट दिली. त्यानंतर केंद्रीय पथकाने परिस्थितीची पाहणी केली. केंद्राकडून भरघोस मदतीचे आश्वासन मिळाले, पण अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
सरसकट मदत हवी -जगदीश बोंडे
अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत देण्याचे सोडाच, शेतकऱ्यांसोबत दुजाभाव करण्यात येत असून विदर्भात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालेले असताना मिळणारी मदत अत्यंत तोकडी आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी उत्पादन खर्च २०० टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल दिला आहे. सरकारचे डोळे आता तरी उघडायला हवे. नुकसान झालेल्या शेतीसाठी सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत दिली जावी, अशी आमची मागणी असल्याचे शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख जगदीश नाना बोंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
जाहीर झालेली मदत केव्हा देणार?
विदर्भात अतिवृष्टीमुळे यंदा कहर केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ हजार ९३५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली, पण दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या हाती मदत न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे.
First published on: 01-10-2013 at 10:56 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When chief minister will give gthe help to farmers