काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणतीही टीका करतांना भान ठेवले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसला गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि गुंडांचा पक्ष, असे संबोधतांना या गुन्हेगारी लोकांसोबतच आपण सरकारमध्ये कशाला सामील झालो आहोत, याचाही विचार प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी करून िहमत असेल तर आघाडी सरकारातून बाहेर पडले पाहिजे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अलीकडेच लगावला आहे.
माणिकराव ठाकरे यांचा त्यांच्या दारव्हा, दिग्रस या गृह मतदार संघातच प्रभाव राहिलेला नाही. या मतदार संघातून ते पराभूत झाले आहेत आणि त्यांनी मागच्या दारातून म्हणजे विधान परिषदेतून विधिमंडळात प्रवेश मिळविलेला आहे, अशी टीका नाईक यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वबळावर उभा राहिलेला ताकदीचा सक्षम पक्ष असून अजितदादा पवारांसारखे धडाडीचे, कर्तृत्ववान नेतृत्व या पक्षाला लाभले आहे, असे सांगून नाईक म्हणाले की, पुढच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होईल की नाही, हे सांगता येत नसले तरी यवतमाळ जिल्ह्य़ात मात्र काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेतही मनोहरराव नाईकांनी दिले.
उल्लेखनीय म्हणजे, दारव्हा मतदार संघातून सलग चार वेळा आपण विधानसभेवर निवडून आलो आहोत, याचा सोयीस्कर विसर मनोहर नाईकांनाच नव्हे, तर राष्ट्रवादीच्या बडय़ा-बडय़ा नेत्यांनाही पडला आहे. त्यामुळेच ते आपल्या एकदा झालेल्या पराभवाचा सतत उल्लेख करून लोकातून निवडून येण्याची क्षमता नसलेला नेता, अशी आपली संभावना करीत असतात, अशी प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाची बाब अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहरराव नाईक यांची ख्याती मौन पाळणारे नेते अशी असली तरी गेल्या काही काळापासून नाईकांनी त्यांचा स्वभाव नसतांना सद्धा काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका करणे सुरू केले आहे.
माणिकराव ठाकरे यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मनोहर नाईकांनी आपल्या टीकेच्या तोफेचे तोंड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे वळवले आहे.
आता काँग्रेसवर टीका करतांना मनोहरराव नाईक हातचे काही राखून ठेवायला तयार नाहीत. जो होगा सो देखा जायेगा, अशी भूमिका घेऊनच नाईक आरोपांच्या फैरी झाडत असल्याची चर्चा आहे.     

Story img Loader