पोलीस अधिकारी म्हटले की कडक गणवेष, रुबाबदार व्यक्तिमत्व समोर उभे राहते. तरुण महिला अधिकारीसुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाची आगळीवेगळी छाप पाडत असतात. हातात काठी किंवा वेळप्रसंगी पिस्तुल घेऊन गुन्हेगारांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांची प्रतिमा मनावर ठसली असतानाच रविवारी घाटकोपरमध्ये मात्र एक वेगळेच चित्र लोकांना प्रेरणा देऊन गेले. रेल्वे पोलीस उपायुक्त असलेल्या रुपाली अंभोरे यांनी थेट झाडू हातात घेत रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम सुरू केली! गुन्हेगारांना सळो की पळो करणाऱ्या मॅडम स्वच्छता करण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरलेल्या पाहून परिसरातील लोकही त्या मोहिमेत सहभागी झाले.
घाटकोपर पूर्वेकडील प्रियदर्शिनी नगर येथे ३० एकर जागेवर रेल्वे पोलिसांची सर्वात मोठी वसाहत आहे. मैदान सोडले की उर्वरित ठिकाणी २४ निवासी इमारती आहेत. त्यात १४०० कुटुंब राहतात. पण आसपासचा परिसर कचरा आणि घाणीने भरलेला आहे. पालिका आणि सार्वजनिक खात्यातील वादामुळे या भागात कुणाचेच लक्ष नाही. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत असल्याने फार कुणी गंभीरतेने दखलही घेत नव्हते. रेल्वेच्या मध्य विभागाच्या पोलीस उपायुक्त रुपाली अंभोरे यांनी ही परिस्थिती पाहिली. केवळ संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यापेक्षा श्रमदानाने या परिसराची स्वच्छता होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ‘एक दिवस पोलिसांसाठी’ या अभियानाचे आयोजन केले. रविवारी सकाळी त्या स्वत: स्वच्छता करण्यासाठी परिसरात आल्या. हातात झाडू घेऊन त्यांनी कामाला सुरवात केली. सोबत महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते होते. चक्क आपल्या मॅडम खाली उतरल्याचे पाहून इमारतीमधील पोलीस कर्मचारीही  रस्त्यावर उतरले आणि प्राथमिक स्वच्छतेचे काम सुरू झाले. दुपारी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे ही माहिती गेली. त्यांनी मग यंत्रसामग्री पाठवून मोठी कामे सुरू केली. या मोहिमेमुळे तेथील अस्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात येथे वाढणारी झुडपे आणि पसरणारी रोगराई वेळीच रोखणे गरजेचे होते. मी पालिका आणि स्वयंसेवी संस्थांना भेटले. पण प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेची सुरवात होणे गरजेचे होते म्हणून ही मोहीम हाती घेतली, असे रेल्वेच्या पोलीस उपायुक्त रुपाली अंभोरे म्हणाल्या. केवळ आदेश देणे सोपे असते पण रस्त्यावर उतरणे कठीण असते. आमच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरण्यात मला काहीच कमीपणा वाटला नाही, असेही त्या म्हणाल्या. ‘एक दिवस पोलिसांसाठी’ या मोहिमेला अनेकांनी प्रतिसाद दिला आणि दर महिन्यात या अभियानाअंर्तगत या वसाहतीत सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

Story img Loader