अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यामुळे मुंबईत कधी एकदा पाऊस सुरू होतो, त्याकडे मुंबईकर डोळे लावून बसले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘नभ मेघांनी आक्रमिले’ असे चित्र पाहायला मिळत असल्यामुळे लवकरच पाऊस सुरू होईल, अशी मुंबईकरांची अपेक्षा असली तरी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत दाखल होणारा नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईकरांना वाकुल्या दाखवत आहे. काही अपवाद वगळता पावसाने आपला लहरीपणाच दाखवून दिला आहे. त्यामुळे न्यायालयातील खटल्याप्रमाणे मुंबईतील पावसाच्या आगमनाविषयी दरवर्षीच ‘तारीख पे तारीख’ पडत असते.
पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वसाधारणपणे ७ ते १० दिवसांत मुंबईत येतो. मुंबईत १० जूनपासून मोसमी पाऊस सुरू होतो, असे मानले जाते. मात्र त्यातही नियमितता असतेच असे नाही. १९५९ मध्ये २५ जून रोजी पाऊस मुंबईत दाखल झाला होता. २०११ मध्ये केरळात ३० मे रोजी दाखल झालेला पाऊस मुंबईत अवघ्या पाच दिवसांत आला होता. तर २००९ मध्ये केरळात २४ मे रोजी दाखल झालेला पाऊस मुंबईत तब्बल एक महिन्यानंतर आला. गेल्या वर्षी नियोजित तारखेपेक्षा सात दिवस पाऊस उशीरा दाखल झाला तर २०११ मध्ये तो ५ जून रोजी आला होता. २००६ मध्ये सगळ्यात लवकर म्हणजे ३१ मे रोजीच आणि २००४ मध्ये १० जून रोजी मुंबईत दाखल झाला होता.
नैऋत्य मोसमी पाऊस पहिल्यांदा अंदमानमध्ये दाखल होतो. साधारणपणे दरवर्षी २० मे च्या सुमारास अंदमानात दाखल होणारा मान्सून यंदा तीन दिवस लवकर दाखल झाला आहे. अंदमानातून तो १० दिवसात केरळमध्ये तर त्यानंतर सात ते दहा दिवसात मुंबईत येतो. पण हे दरवर्षीच ठरल्याप्रमाणेच घडेल, असे नाही. कारण नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यामध्ये हवामानात होणार बदल, समुद्रात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती आदी अन्य घटकही कारणीभूत असतात असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
गेल्या दहा वर्षांत मुंबईत मान्सून कोणत्या तारखेला दाखल झाला त्याची माहिती :
२००२-१२ जून, २००३-१६ जून, २००४-१० जून, २००५-१९ जून, २००६-३१ मे, २००७-१८ जून,२००८- ७ जून, २००९-२४ जून, २०१०-११ जून, २०११-५ जून आणि २०१२-१७ जून.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा