घाटकोपर आणि कुर्ला स्थानकातील अपघातामुळे सामान्य प्रवाशांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकात खड्डा भरण्याच्या कामांना सुरुवात केली. ठाणे आणि इतर स्थानकातील फलाटांच्या उंची वाढवण्याच्या कामासही गती देण्यात आली आहे. स्थानकातील अनधिकृत प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या अमर्यादित मार्गावर र्निबध आणण्याबरोबरच रेल्वे रुळाच्या बाजूच्या सुरक्षा भिंतीच्या कामांना पुढील वर्षभरात वेग देण्यात येणार आहे. त्यामुळे रूळ ओलांडण्याच्या प्रकारांना वेसण बसण्याबरोबरच अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
घाटकोपर स्थानकामध्ये गेल्या आठवडय़ात सोळा वर्षीय मोनिका मोरेचा अपघात झाल्यानंतर रेल्वे स्थानकातील फलाटांच्या उंची, अडथळा ठरणारे खड्डे आणि गाडी व फलाटांमधील फटींवरून रेल्वे प्रशासन अडचणीत आले आहे. त्यामुळे शक्य होईल तितक्या जलदगतीने ठाणे स्थानकातील रेल्वे फलाटांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याच पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना आखल्या असून त्यांच्या काटेकोर पालनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. रेल्वेस्थानकात अनेक छुपे मार्ग असून त्यांचा वापर धोकादायक ठरत आहे. कोपरीकडून येणारे रूळ ओलांडून रेल्वे स्थानकात ये-जा करतात. पुढील सर्वच स्थानकांमध्ये अशा मार्गाची संख्या अधिक असून सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर र्निबध आणून अपघात टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.      
ठाणे आणि त्याच्या पुढील शहरांच्या रेल्वे रुळांच्या बाजूच्या संरक्षक भिंतीची रखडलेली कामेही मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रुळांच्या आजूबाजूला संरक्षक भिंत नसल्याने प्रवासी रेल्वे रुळावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. रूळ ओलांडण्याचे प्रकारही यामुळे सर्रास सुरू आहे. रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा असून संरक्षक भिंत नसल्याने हा प्रकार होत आहे. त्यामुळे हा प्रवास अधिक धोकादायक बनला आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी संरक्षक भिंतीचा पर्याय अनेक वर्षांपासून राबवण्यात आला असला तरी तो ठाण्याच्या पुढील स्थानकात पूर्णत्वास आलेला नाही. अनेक वर्षे होऊनही ही कामे ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे कळवा येथील रेल्वे फाटक, दिवा स्थानकातील रेल्वे फाटक, कोपर स्थानक आणि कल्याणच्या पुढील अनेक स्थानकांमध्ये रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रकार रोज घडत असल्याने या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या अपघाताचे शिकार होत आहेत. त्यामुळे रेल्वे संरक्षक भिंत हा पर्याय अधिक प्रभावीपणे राबविणार असल्याचे रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा भिंतींचे काम प्रगतिपथावर!
रेल्वे सुरक्षा भिंतींचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असून मुंबई उपनगरांच्या आजूबाजूची बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षभरात या कामांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे ठाणे आणि त्यापुढच्या कामांनाही पुढील वर्षभरात वेग येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली.
केवळ आश्वासनेच!
संरक्षक भिंतीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून ती कामे अद्याप पूर्ण न होणे अत्यंत दुर्दैवी आहे. निधी नाही असे कारण देऊन रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे. संरक्षक भिंतीचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिलेल्या रेल्वे प्रशासनाने केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कामातून प्रवाशांचे संरक्षण करण्याची गरज आहे. प्रवासी विश्वासाने रेल्वेचा प्रवास करत असतो त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबादारी रेल्वेची आहे, असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी महामंडळाचे सल्लागार अॅड. दत्तात्रय गोडबोले यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader