रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेस्थानके विमानतळासारखी अद्ययावत करण्याचा मानस रेल्वे बजेटच्या वेळी बोलून दाखवला खरा, मात्र पनवेल ते खारघर रेल्वे प्रवाशांचे हाल संपण्याचे नाव घेत नाहीत. मात्र पनवेलच्या मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकांमधील प्रवाशांच्या पायाभूत सुविधांसाठी नारा कायम राहिला आहे.
खांदेश्वर आणि मानसरोवर या दोन्ही स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहाचा ताबा खासगी कंत्राटदाराकडे आहे. महिलांसाठी चार रुपये आणि पुरुषांसाठी २ रुपये देऊन येथे शौचालयाची सुविधा आहे.
मात्र रात्री येथे विजेचा अभाव असतो. या दोन्ही स्थानकांमध्ये दोन ईव्हीएम मशीन बसविल्या आहेत. मात्र त्या सतत बंद अवस्थेत असतात. ईव्हीएम रिचार्जसाठी पनवेलशिवाय या प्रवाशांना पर्याय नाही. खांदेश्वर स्थानकातील मुंबईला जाणाऱ्या प्रवाशाला स्वच्छतागृहात जाण्याचा योग आल्यास त्याला स्थानकातील शंभर पावलांचे अंतर कापूनच शौचालय गाठता येते. किमान स्थानकांच्या दोन्ही ठिकाणी स्वच्छतागृहे असावीत, अशी माफक अपेक्षा प्रवाशांची आहे. पनवेल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे रेल्वे टर्मिनल होणार आहे. येथील प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी गुडघ्यांवर जोर देऊन ज्येष्ठ आणि अपंग प्रवाशांना जिने चढावे लागतात. येथे सरकते जिणे असावे अशी येथील प्रवाशांची मागणी होती. रेल्वेमंत्र्यांच्या स्वयंचलित जिने लवकरच करण्याच्या घोषणेने पनवेलचा प्रवासी आश्वासनिक फुंकर मारून सुखावला आहे.

पनवेल-कर्जत लोकलची आशा धुसर..
आठ वर्षांपासून पनवेल-कर्जत लोहमार्ग खुला झाला आहे. या मार्गावरून प्रवासी एक्स्प्रेस गाडय़ा धावतात. मात्र या रेल्वे बजेटमध्ये पनवेल-कर्जत लोकलची घोषणा होण्याची अपेक्षा चाकरमान्यांना होती. रेल्वेमंत्र्यांनी लोणावळा ते कर्जत या गाडीची घोषणा केल्यामुळे कर्जत-पनवेल लोकल कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. कर्जतहून नोकरीनिमित्त मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाला सध्या लोहमार्ग असूनही वळसा मारून हा प्रवास करावा लागतो.

Story img Loader