‘शंकुतला’ या नावानेच ओळख असलेल्या आणि आजही ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर या नॅरोगेज रेल्वेने निसर्गाच्या सहावासाचा अपूर्व आनंद लुटण्यासाठी प्रवास करण्याऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली असतांनाच अचानक ‘शंकुतला’चा प्रवास अनेकदा  अवरुध्द होण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी या नॅरोगेज रेल्वेचे रूपांतर ब्रॉडग्रेजमध्ये कधी होणार, असा संतप्त सवाल सेना खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत रेल्वेमंत्र्यांना अनेकदा विचारला असला तरी रेल्वे प्रशासन कोणतेच नक्की उत्तर देत नाही. रेल्वे प्रशासनाविरुध्द त्यांनी पदर खोचून केलेल्या आंदोलनामुळे ‘शंकुतला’चा श्वास पुन्हा मोकळा होऊन ‘शकुंतला आली रे आली’च्या गजरात प्रवाशांनी शंकुतलेचे जोरदार स्वागत केले.
रेल्वे रूळ कमजोर झाल्याचे कारण सांगून रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद केली होती. उल्लेखनीय म्हणजे, यवतमाळ-मूर्तीजापूर, पुलगाव-आर्वी
आणि मूर्तीजापूर-अचलपूर या विदर्भातील तीन नॅरोगेज रेल्वे आजही ब्रिटिश कंपनी ‘क्लिक निक्सन’ यांच्या ताब्यात असून या कंपनीशी भारत सरकारचा करार झालेला आहे. यात तीनही मार्गाचे रूपांतर ब्रॉडग्रेजमध्ये करण्याची मागणी दुर्लक्षित करून पुलगाव-आर्वी रेल्वे कायमची बंद करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग आता अक्षरश भंगार झाला आहे. यवतमाळ-मूर्तीजापूर ही शंकुतला यापूर्वी बंद करण्याचा घाट घालण्यात आला होता. वेगवेगळे निमित्य सांगून मध्यंतरी ती बंद ठेवण्यात आली होती, पण खासदार भावना गवळी यांच्या इशाऱ्यामुळे शंकुतला पूर्ववत चालू लागली होती. मात्र, पुन्हा शंकुतलेच्या चालू-बंदचा लपंडाव प्रवाशांना हैराण करू लागला आणि तिचे चालणे आण्खी एकदा बंद  झाले होते. डिझेल इंजिनवर चालणाऱ्या या चार डब्यांच्या नॅरोगेज रेल्वेने यवतमाळ-मूर्तीजापूर असा ११३ कि.मी. अंतराच्या प्रवासात लासीना, िलगा, लाडखेड, तपोना, दारव्हा (मोतीबाग), वरडखेड, सांगवी, सोमठाणा, कारंजा टाऊन, कारंजा, पोही, पिलेगाव, विनखेड आणि मूर्तीजापूर, अशी १४ स्टेशन्स लागतात.
उल्लेखनीय म्हणजे, एस.टी.प्रवास भाडय़ात प्रचंड वाढ झाली असतांना शंकुतला मात्र मूर्तीजापूपर्यंतचा प्रवास फक्त २५ रुपयात घडवते. दारव्ह्य़ाचे तिकिट फक्त १० रुपये आणि कारंजाचे फक्त २० रुपये तिकिट आहे. गंमत अशी की, या मार्गावरील यवतमाळ, दारव्हा, कारंजा आणि मूर्तीजापूर अशी चारच ठिकाणचे स्टेशन्स सुरू आहेत. बाकी सर्व अक्षरश उध्वस्त झालेली आहेत. दुसरी गंमत म्हणजे, रेल्वेच्या डब्यातच एस.टी.च्या कंडक्टरप्रमाणे प्रवाशांच्या जवळ येऊन टी.सी.साहेब तिकिट देतात. उल्लेखनीय म्हणजे, शंकुतलाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्यासाठी एक याचिकाही संसदेच्या याचिका समिती समोर दाखल झाली असून समितीचे अध्यक्ष खासदार अनंत गीते यांच्यासमोर तीनदा सुनावणी झाली. यवतमाळ-मूर्तीजापूर मार्गावर इंग्रजांनी पंधरा ठिकाणी  रेल्वे स्टेशन बनवले होते. त्या ठिकाणी आता िखडारे झाली आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही अन्यत्र सामावून घेण्यात आले आहे. पूर्वी दिवसातून दोनदा ये-जा करणारी ‘शकुंतला’ आता फक्त एकदाच जाते-येते.