निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच गुणपत्रिका देण्यात यावी, असा नियम असताना दोन आठवडे उलटले तरी टीवायबीकॉम, बीएमएम आदी अभ्यासक्रमांच्या जाहीर निकालाच्या गुणपत्रिकाच विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत.
टीवायबीकॉमचा निकाल २९ मे रोजी विद्यापीठाने जाहीर केला. टीवायबीकॉमचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या भरमसाट संख्येमुळे नेहमीच विद्यापीठाची परीक्षा पाहणारा ठरतो. दोन वर्षांपूर्वी हा निकाल तब्बल १०० दिवस लांबल्याने विद्यापीठाच्या एका परीक्षा नियंत्रकांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. टीवायबीकॉमच्या उत्तरपत्रिका तपासणीचा भार कमी करण्यासाठी विद्यापीठाने त्याच वर्षी केवळ या शाखेसाठी ६०-४०ची (६० गुण लेखीचे आणि ४० अंतर्गत मूल्यांकनाचे) अफलातून शक्कल लढविली. त्यामुळे विद्यापीठावर केवळ ६० गुणांच्या लेखी परीक्षेची जबाबदारी राहिल्याने आपोआपच उत्तरपत्रिका तपासणीचा भार ४० टक्क्यांनी कमी झाला. गेल्या वर्षी ५० दिवसांत निकाल जाहीर झाला. या वर्षीही परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आतच नव्हे तर कमीत कमी दिवसांत निकाल कसा जाहीर केला ही टिमकी वाजविण्यासाठी २९ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घाईघाईत विद्यापीठाने टीवायबीकॉमचा निकाल जाहीर करत आपली पाठ थोपटून घेतली, पण निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत.
टीवायबीकॉमचा निकाल जाहीर केल्यानंतर १०-११ जूनला महाविद्यालयांकडे गुणपत्रिका पाठविण्यात आल्या, परंतु सध्या सर्वच महाविद्यालये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतलेली आहेत. त्यामुळे त्यांना विद्यापीठाकडून आलेल्या गुणपत्रिकांच्या गठ्ठय़ांकडे पाहण्याचीही उसंत नाही. बहुतांश कर्मचारी वर्ग प्रवेश प्रक्रियेत गुंतल्याने दोन-तीन दिवस तरी गुणपत्रिका वाटता येणार नाहीत, असे मध्य मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले. म्हणजेच निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन आठवडय़ांच्या विलंबानंतरच विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रिका पडणार आहेत.
बीएमएमचा निकाल तर विद्यापीठाने २४ मे रोजी जाहीर केला होता, पण बीएमएमच्या गुणपत्रिका अद्याप महाविद्यालयांकडेच पोहोचलेल्या नाहीत. पदवीच्या इतर विषयांचीही हीच बोंब आहे. बीकॉमच्या ‘अकाऊंट अॅण्ड फायनान्स’, ‘बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स’, ‘अकाऊंट अॅण्ड फायनान्स’च्या, बीएमएस, बीएस्सी-आयटी आदी स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांचे तर निकालही अद्याप विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थीही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
नियमाचा भंग
‘निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या पाहिजेत, असा ठराव अधिसभेत झाला होता, पण ऑनलाइन निकाल जाहीर करण्याच्या गेल्या काही वर्षांत रूढ झालेल्या पद्धतीमुळे या नियमाला हरताळ फासला जातो आहे,’ याकडे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप करंडे यांनी लक्ष वेधले.
‘विद्यापीठाला सध्या केवळ निकाल जाहीर करण्याची घाई असते, पण गुणपत्रिकांचे काम सोयीनुसार सावकाशपणे होते. गुणपत्रिकेशिवाय विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांना वा परदेशातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळत नाही. म्हणूनच निकाल जाहीर केल्यानंतर दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हातात त्यांची गुणपत्रिका पडली पाहिजे,’ अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुणपत्रिकांचा ‘निकाल’ कधी?
निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच गुणपत्रिका देण्यात यावी, असा नियम असताना दोन आठवडे उलटले तरी टीवायबीकॉम, बीएमएम आदी अभ्यासक्रमांच्या जाहीर निकालाच्या गुणपत्रिकाच विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-06-2013 at 12:23 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When students will get mark sheet after result