विदर्भातील शेतकऱ्यांपुढे नुकसानभरपाई प्रश्नचिन्ह
विदर्भात अतिवृष्टीमुळे यंदा कहर केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ हजार ९३५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली, पण दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या हाती मदत न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. दोन वर्षांपूर्वी अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई या महिन्यात शेतकऱ्यांना मिळाली. आता ही मदत केव्हा मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जून आणि जुलैमध्ये संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. भरीस भर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही अतिपावसाने अनेक भागात शेती उध्वस्त झाली. नुकसानीचे सर्वेक्षण आणि त्याचे अहवाल सरकापर्यंत पोहोचण्यात बराच वेळ गेला. सप्टेंबर महिना उजाडण्यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असे सांगण्यात येत होते, पण घरांची पडझड, मृतांच्या कुटुंबीयांना तात्पुरती मदत आणि पशुपालकांना सहाय्य, ही मलमपट्टी वगळता शेतकऱ्यांच्या हाती छदामही आलेला नाही. विदर्भात सुमारे २ हजार कोटी रुपयांची पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. अमरावती विभागात जून आणि जुलैमध्ये ८ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणादरम्यान निदर्शनास आले होते. सुमारे ४५ हजार घरांची पूर्णत: अथवा अंशत: पडझड झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयात संकलित करण्यात आलेल्या अहवालात नमूद आहे, पण शेतकऱ्यांना मदतीच्या बाबतीत जे धोरण ठरवण्यात आले त्यात ज्या शेतकऱ्यांचे पन्नास टक्क्यांवर नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनाच मदत दिली जाईल, हे स्पष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांना धक्का बसला. विभागीय आयुक्त कार्यालयातून एकत्रित अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला. त्यात ४ लाख ८८ हजार १९७ हेक्टरमध्ये पीकहानी झाल्याचे नमूद आहे. अध्र्या अधिक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा