इंदिरा गांधींनी १९७५ साली देशात लागू केलेल्या आणिबाणीचे शिवसेनाप्रमुखांनी समर्थन केल्याने देशातील मोठे जनमानस त्यांच्या विरोधात गेले होते. आणिबाणी उठविल्यानंतर १९७७ च्या निवडणुकीत केंद्रात जनता पक्षाचे सरकार सत्तारूढ झाल्यावर मुंबईत शिवसेनेला प्रचंड विरोध झाला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तर शिवसेनेच्या सर्वसामान्य नेत्यांना मुंबईत फिरणे सुध्दा कठीण झाले होते. सेना भवनावर दगडफेक झाली, तेथील दारे-खिडक्यांची काचेची तावदाने फोडण्यात आली होती. शिवसेना अत्यंत हतबल अवस्थेत असताना शिवसेनेच्या मदतीसाठी विदर्भात वारे शेर, आया शेरच्या उदघोषाने आसमंत भेदणाऱ्या फारवर्ड ब्लॉकच्या जांबुवंतराव धोटे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी हाक दिली होती. जांबुवंतराव धोटे आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना घेऊन थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी आणि सेनाभवनात पोहोचले होते.
विदर्भाचा शेर मुंबईच्या सेनेच्या टागरच्या मदतीला धावून गेला, अशा आशयाचे मथळे असलेला मजकूर त्यावेळी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाला होता. शिवसेना भवनात जांबुवंतराव धोटे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दीर्घ चर्चा करून मुंबईच्या आझाद मदानात सेनेची विराट सभा आयोजित करण्याचा कार्यक्रम आखला. ठाकरे आणि धोटे यांच्या मदतीला दलीत पँथचे नेते नामदेव ढसाळ सुध्दा धावून आले होते. आझाद मदानातील त्या विराट सभेला विदर्भाचा ‘शेर’ जांबुवंतराव धोटे, सेनेचा ‘टायगर’ बाळासाहेब ठाकरे आणि दलितांचा ‘पँथर’ नामदेव ढसाळ यांनी पहिल्यांदाच एकत्रपणे संबोधित केल्याचे अभूतपूर्व दृश्य महाराष्ट्राने अनुभवले होते. आणि त्यानंतरच शिवसेनेचा जम महाराष्ट्रात बसला, अशी आठवण जांबुवंतराव धोटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितली.
बाळसाहेब ठाकरे यांच्या मदतीला धावल्यानंतर व पुढे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बाळासाहेबांची साथ का सोडली, शिवसेनेचाही त्याग का केला व विदर्भ जनता काँग्रेसची स्थापना का केली? या प्रश्नांच्या उत्तरात जांबुवंतराव धोटे म्हणाले, मी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी शिवसेना पूर्ण सहकार्य करील, अशी हमी बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. मात्र नंतर त्यांनी विदर्भ होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे आपण शिवसेनेचा त्याग करून बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली. विदर्भ जनता काँग्रेसच्या माध्यमातून विदर्भ राज्य निर्माण होईल, असा आजही आपल्या विश्वास आहे. असे धोटे म्हणाले. मुंबईच्या शिवाजी पार्क मदानावर टायगर, लॉयन आणि पँथर एकत्र आल्याचे ते दृष्य आणि त्या वेळच्या वर्तमानपत्रातील या बाबतच्या आकर्षक मथळयांची आजही आठवण झाली की भूतकाळातील ते दिवस कसे शौर्याचे होते. याची जाणीव होते, या आठवणीत धोटे गढून गेले होते.
‘शेर’, ‘पँथर’ आणि ‘टायगर’ एकत्र आले तेव्हा..
इंदिरा गांधींनी १९७५ साली देशात लागू केलेल्या आणिबाणीचे शिवसेनाप्रमुखांनी समर्थन केल्याने देशातील मोठे जनमानस त्यांच्या विरोधात गेले होते.
आणखी वाचा
First published on: 18-11-2012 at 03:49 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When tiger panther leopard came togather