गडचिरोली जिल्ह्य़ाच्या निर्मितीपासून आतापर्यंत जिल्ह्य़ाच्या विकासाच्या नावाखाली केंद्राकडून, राज्याकडून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही प्राप्त झालेल्या कोटय़वधी निधींची लुट झाली आहे.
या निधीचा पुरेपूर वापर न झाल्याने आजही हा जिल्हा मागासलेलाच आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्य़ाला आजपर्यंत प्राप्त झालेल्या निधीवरील खर्चाबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी आणि निधी कसा खर्च झाला याबाबत सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केली आहे.
पत्रकार परिषदेत प्रकाश ताकसांडे यांनी जिल्ह्य़ातील अनेक समस्यांचा पाढा वाचीत सरकार, प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधींवर कडाडून टीका केली. गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवाद  निर्मूलनाच्या नावाखाली विशेष कृती कार्यक्रम लागू करून शासनाने या जिल्ह्य़ासाठी करोडो रुपये ओतले.
आदिवासी विकास विभागामार्फतही करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. नक्षलवाद निर्मूलनाच्या नावाखाली आजही मोठय़ा प्रमाणावर या जिल्ह्य़ाला निधी प्राप्त होत आहे.इतर अन्य योजनांवरही मोठय़ा प्रमाणावर निधी प्राप्त होत असून तो खर्च केला जात आहे. मात्र, प्राप्त निधी आणि झालेल्या खर्चाचे फलित काय? असा प्रश्न उपस्थित करून ताकसांडे म्हणाले की, करोडो रुपये खर्च करूनही या जिल्ह्य़ातील नक्षलवाद संपुष्टात आलेला नाही, आदिवासींचीही स्थिती सुधारली नाही. प्राप्त निधींचा विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य वापर न झाल्याने जिल्ह्य़ाचे मागासलेपण कायमच आहे. जिल्ह्य़ात अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहे. काही संस्थांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातीप्राप्त असून त्या संस्थांना आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही मोठय़ा प्राणावर निधी प्राप्त होत आहे. मात्र, तरी देखील सामाजिक विकासाची प्रक्रिया गतिमान झालेली नाही. आजही या जिल्ह्य़ात माता, मुल, बालमृत्यू, कुपोषण यासारख्या समस्या कायम आहेत. याकडे ताकसांडे यांनी लक्ष वेधले. शासन, प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे हा सर्व प्रकार घडत असून जिल्ह्य़ाला गेल्या ३० वर्षांच्या काळात प्राप्त झालेल्या निधीतून या जिल्ह्य़ाला काहीच लाभ झालेला नसल्याने जिल्ह्य़ाच्या आर्थिक घडामोडींची श्वेतपत्रिका काढण्यात यावी तसेच प्राप्त झालेल्या निधीतून खर्च कसा झाला व त्याचे फलित काय याबाबत सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश ताकसांडे यांनी केली आहे.

Story img Loader