अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून चिरीमिरी घेताना नेहरूनगर पोलीस ठाण्याचे तब्बल ३६ पोलीस पकडले गेल्यानंतर आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना आपापल्या पोलीस ठाण्यातील भ्रष्ट पोलिसांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. परंतु बहुतांश वरिष्ठ निरीक्षकांना, आपल्या पोलीस ठाण्यात कोण पोलीस भ्रष्ट आहेत, याचा शोध घेण कठीण झाले आहे. त्यामुळे अशी यादी सादर झालेली नाही, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.
प्रत्येक पोलीस ठाण्यात चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांची संख्या कमी नाही. किंबहुना पोलिसांची हप्तेबाजी हा सार्वत्रिक चर्चेचा विषय असतो. पोलिसांकडून हप्ते घेतले जाणार वा पोहचवावे लागणार हे गृहीत धरून धंदेवालेही वावरत असतात. पंरतु याही पलीकडे जाऊन प्रत्येक बीट चौकीतील पोलीस आपापल्या ऐपतीने भ्रष्टाचार करीत असतो. हक्क असल्याप्रमाणेच ते सामान्यांकडूनही पैसे गोळा करतात. मात्र नेहरू नगर पोलीस ठाण्यातील ३६ पोलिसांच्या ते अंगाशी आले. त्यांना निलंबित व्हावे लागले. त्यानंतरही पोलिसांची हप्तेबाजी बंद झाली नाही. अशातच आयुक्तांनी अशा भ्रष्ट पोलिसांची यादी तयार करण्यास सांगितल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकाची पंचाईत झाली. किंबहुना या यादीत आपल्या ऑर्डर्लीचा समावेश करावा लागेल, या भीतीने वरिष्ठ निरीक्षकांनी यादी करण्याचेच टाळले आहे. पोलीस आयुक्तांकडूनही विचारणा होत नसल्यामुळे जितका वेळ घालवता येईल, तितका आम्ही घालवत असल्याचे एका वरिष्ठ निरीक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
काही वरिष्ठ निरीक्षकांनी अशी यादी तयार केली असली तरी ती पुढे पाठविलेली नाही. अशी यादी तयार करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर सोपविली आहे त्यांच्याकडून काही पोलिसांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. किंबहुना पोलीस ठाण्यात असलेल्या गटबाजीचाहीया यादीसाठी वापर केला जाण्याची शक्यता गृहित धरून वरिष्ठ निरीक्षकांनी अशी यादी तयार करावी का, असा सवाल उपस्थित केला आहे. एका उपायुक्तांनीही हीच प्रतिक्रिया दिली. रात्रंदिवस बंदोबस्त वा तत्सम डय़ुटी करणारा पोलीस शिपाई चिरीमिरी घेतो याची आम्हालाही कल्पना असते. परंतु ते आम्ही गृहित धरतो. मात्र याबाबत तक्रारी आल्या आणि एखादा पोलीस खूपच त्रास देत असेल तर आम्ही कारवाईही करतो, असा दावा केला. परंतु अशी यादी सादर केली तर काही पोलिसांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मतही या उपायुक्ताने व्यक्त केले. पोलिसांचाच भ्रष्टाचार सगळ्यांना दिसतो. परंतु महापालिका, म्हाडा वा महसूल खात्यात चिरीमिरीऐवजी पेटय़ा-खोक्यांमध्येच बेनामी व्यवहार चालतो. परंतु ते कधीही पकडले जात नाही, अशी प्रतिक्रिया एका शिपायाने व्यक्त केली. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, आपण या प्रकरणी माहिती घेऊ, असे त्यांनी सांगितले.
आपल्यात भ्रष्ट कोण? पोलिसांनाच पडला प्रश्न
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून चिरीमिरी घेताना नेहरूनगर पोलीस ठाण्याचे तब्बल ३६ पोलीस पकडले गेल्यानंतर आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना आपापल्या पोलीस ठाण्यातील भ्रष्ट पोलिसांची यादी तयार करण्यास सांगितले आहे.
आणखी वाचा
First published on: 25-04-2013 at 02:03 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who are corrupt in ous question in front of police