शहरातील विविध विकास कामाचा प्रशासकीय आढावा घेत असताना संबंधीत विभागाकडून जनतेच्या हिताची कामे लवकर व्हावी, असे निर्देश देण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनाचे पालन केले नाही किंवा कामात दिरंगाई करीत असेल तर संबंधीत अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी त्यांना निलंबितसुद्धा करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. शहरातील समस्या अनेक असल्या तरी प्रत्येक समस्या आणि शहरातील प्रश्न दूर करण्यासाठी कालावधी कमी आहे. कुठल्याही क्षणी निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त काम करून शहराचा विकास कसा करता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या जात असून त्यांना निर्देश दिले आहे. मात्र, ते पालकमंत्र्यांच्या सूचनांचे पालन करीत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
शहरातील रस्ते, विजेचे वाढते बिल, सुरक्षा आदी विषय गंभीर झाले आहे. या सर्व विषयावर अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन आढावा घेतला जात असल्याचे राऊत यांनी सांगितले. नरेगासाठी पूर्वी केवळ ३५० कोटीचे बजेट १६०० कोटी करण्यात आले असून त्याचा उपयोग ग्रामीण भागात शेतमजुरांसाठी केला जात आहे.
शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प सुरू करताना त्यात राजकारण केले जात आहे. मेट्रोचा प्रकल्पाचा प्रस्ताव हा राज्य सरकारने पाठविला. मात्र, केंद्र सरकार याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेट्रोचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. त्यावेळी कॅबिनेट बैठकीत मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पात काँग्रेसचा वाटा आहे. काँग्रेसने विकासाच्या बाबतीत कधीच राजकारण केले नाही. सर्वपक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम केले पाहिजे. केंद्र सरकारने १ हजार कोटी रुपये दिले आणि राज्य सरकार त्यात २०० कोटी रुपये देईल तर या शहराचा विकास होऊन हे शहर पहिल्या क्रमांकाचे होईल. मात्र, आज विकासाच्या नावाखाली राजकारण केले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
विदर्भाच्या मुद्यावर बोलताना डॉ. राऊत म्हणाले, सुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भाच्या लढाईत सक्रिय आहे. स्वतंत्र विदर्भ झाला तर या भागाचा विकासही झपाटय़ाने होईल. काँग्रेसने विदर्भाच्या बाबतीत भाजपसारखी कधी दुटप्पी भूमिका घेतली नाही. जोपर्यंत विदर्भ होणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही, असेही राऊत म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा