हजारो उमेदवारांमधून फार कमी पात्र ठरलेले मात्र नियुक्तीपत्रच न मिळालेले आदिवासी आश्रमशाळांचे काही शिक्षक मंगळवारपासून बेमूदत संपावर गेले आहेत. नववर्षांच्या पार्टीची धुंदी अद्याप लोकांच्या डोळ्यातून उतरायची आहे. मात्र, नोकरीसाठी सर्व औपचारिकता पूर्ण करूनही आदिवासी आश्रमशाळेच्या पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रासाठी वणवण करावी लागत आहे. नियुक्तीपत्राअभावी रखडलेली उमेदवारांची नियुक्ती गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळेच स्वत:वरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
आदिवासी विभागांर्तगत येणाऱ्या आश्रमशाळांतील भ्रष्टाचार, गरीब मुलांचा छळ आणि इतर त्रुटींसाठी सतत गाजत असलेला आदिवासी विभाग आता पात्र शिक्षकांना नियुक्ती पत्र न देता त्यांच्यावर अन्याय करण्याच्या प्रकारामुळे पुन्हा प्रकाशात आला आहे. अमरावतीत आश्रमशाळांसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया पार पडूनही पात्र असलेल्या उमेदवारांना रूजू करण्यात आले नाही. म्हणूनच त्यांनी अपर आयुक्त आदिवासी विकास विभागासमोर बेमूदत उपोषण आरंभल्याचे कळवले आहे.
ऑगस्टमध्ये आश्रमशाळेसाठी अमरावती विभागातील शिक्षक भरतीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिल्या. त्यानंतर निकालही जाहीर झाला. कागदपत्रांची पडताळणीही झाली मात्र, या चार महिन्यांपासून गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक शिक्षण सेवकांची ९८ पदे तर उच्च प्राथमिकच्या अनेक पदांसाठी परीक्षा घेण्यापासून ते कागदपत्र पडताळणीपर्यंतची सर्वच प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. आता केवळ उमेदवारांना नियुक्तीपत्र बहाल करणे एवढीच औपचारिकता उरली असताना आदिवासी खाते त्याची पूर्तता करीत नसल्याने उमेदवारांवर उपोषणाची वेळ आली आहे. मंगळवारी २० उमेदवारांनी उपोषण करणे आरंभले असून लवकरच आणखी उमेदवारांची त्यात भर पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा