जिल्ह्य़ातील शहरी व ग्रामीण भागासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष आहे, असा दावा करून बुलढाणा लोकसभा मतदार संघावर कॉंग्रेसचाच हक्क, असा हट्ट राष्ट्रीय पक्ष निरीक्षकांकडे करीत जिल्ह्य़ातील कॉंग्रेसच्या सर्व गटांनी राष्ट्रवादीला हात दाखवून कुरघोडी करण्याचा पराकोटीचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ाच्या आगामी राजकारणात कॉंग्रेस-राष्ट्रवादीत छुप्पा व मैदानी संघर्ष पेटण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.
विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ व गोंदिया, अशा तीन लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादीने अग्रहक्क असल्याचे वेळोवेळी कॉंग्रेसला बजावले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा व गोंदिया हे मतदार संघ राष्ट्रवादीकडे होते. गोंदियात केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यशस्वी झाले. बुलढाण्यात अवघ्या पंचवीस हजार मतांनी राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे सेना-भाजप उमेदवारांकडून पराभूत झाले.
या पाश्र्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीला हवे आहेत. यासोबतच या पक्षाने यवतमाळवरही हक्क सांगितला आहे. एवढेच काय, पक्षाने गोंदियात प्रफुल्ल पटेल, यवतमाळात मनोहर नाईक व बुलढाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांना निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यास बजावले आहे. बुलढाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीचे इलेक्टिव्ह मेरिटचे उमेदवार आहेत. आजमितीसही राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील राजकारणाचे प्रमुख शक्ती केंद्र डॉ. शिंगणेच आहेत.
राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या शब्दात लोकसभेसाठी डॉ. शिंगणे आमचा बिनीचा पहेलवान मैदानात लंगोट बांधून व दंड थोपटून तयार आहे. ही वस्तुस्थिती असतांना कॉंग्रेसने राष्ट्रवादीला हात दाखवत त्या पक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्राथमिक चाचपणीसाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय पक्ष निरीक्षक एम.रूद्रा राजू हे नुकतेच येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे एकमेकांच्या नावे हाताची बोटे मोडणारे सर्व गट- तट एकत्र झाले.
या सर्वानी जिल्ह्य़ात कॉंग्रेस नंबर वन आहे. शहरी व ग्रामीण भागात पक्षाची ताकद आहे. सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था पक्षाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हा लोकसभा मतदार संघ आता राष्ट्रवादीकडे जाता कामा नये.  तो त्यांच्याकडून हिसकावून घ्या आणि पक्षाच्या पहिलवानाला मैदानात उतरवा, असा आग्रह त्यांच्याकडे धरला. काहींनी तर रामटेकचे खासदार व माजी मंत्री मुकूल वासनिक यांना तिकीट द्या, असाही आग्रह केला. राष्ट्रवादीच्या विरोधातील पक्षनेत्यांचा हा रुद्रावतार पाहून रूद्रा राजू सुखावले नसतील तर नवलच!  त्यांनी राष्ट्रवादीला हात दाखविण्याच्या या राजकीय कारस्थानात मदत करण्याचे भरीव आश्वासन दिले.
जिल्ह्य़ातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नेते काहीसे अस्वस्थ झाले आहेत. लोकसभेच्या बुलढाण्याच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय मोठे साहेब म्हणजे शरद पवार घेतील. त्यामुळे त्याची चिंता नसली तरी कॉंग्रेसवाल्यांनी आतापासूनच राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तापविण्यास सुरुवात केल्याने ही अस्वस्थता निर्माण झाली आहे. कॉंग्रेसच्या काही गटांनी अगोदरच जिल्हा बॅंकेच्या प्रश्नावरून डॉ. शिंगणे यांना आव्हान देऊन त्यांच्या विरोधात वातावरण पेटविले आहे.
आता मतदार संघावर हक्क  सांगून ते राष्ट्रवादी व शिंगणेना अपशकून करू पहात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस व राष्ट्रवादीत पराक ोटीचा संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या राजकारणात कॉंग्रेसवर कुरघोडी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याने तेथेही सुंदोपसुंदीला प्रारंभ झाला आहे. 

Story img Loader