बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांची कोंडी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ वर्षांत विविध नेत्यांना सत्तेची रसद पुरवली. मुंडेंची राजकीय भीती दाखवून सत्तेची पदे पदरात पाडून घेण्याची संधी साधली असली, तरी अखेरीस मुंडेंच्या विरोधात मदानात उतरण्यास एकही नेता तयार नसल्याचे चित्र आहे. सर्वसाधारणपणे लोकसभेची उमेदवारी मिळावी, या साठी आपणच कसे प्रबळ आहोत याचे पोवाडे गायले जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून प्रत्येकजण आपल्यापेक्षा दुसरा कसा सक्षम आहे, हे पटवून देत स्वत: सुरक्षित राहण्यासाठी आटापिटा करीत असल्याने उमेदवार निवडायचा कसा, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला पडला आहे.
सलग १५ वष्रे सत्तेचा खुराक देऊन तयार केलेल्या राजकीय दिग्गजांची केविलवाणी धडपड बघून अखेर बळजबरीने उमेदवार निवडण्याची वेळ राष्ट्रवादीच्या पवार काका-पुतण्यांवर ओढवली आहे. मतदारसंघातील मतांच्या समीकरणात राष्ट्रवादीने मराठा नेत्यांची फौज बांधली. पण जिल्हाभर प्रभाव असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मात्र एका मतदारसंघापुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न दादा टीमने केल्यामुळे सक्षम उमेदवार आणायचा कोठून, असा प्रश्न पडला आहे.
मुंडे यांनी वर्षभरापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर करुन राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर करण्याचे आव्हान दिले. तेव्हापासून पवारांचा शोध सुरू झाला. सुरुवातीला अमरसिंह पंडित, नंतर धनंजय मुंडे यांना पक्षात घेऊन विधान परिषदेची आमदारकी दिली. दोघेही लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले, तरी कोणाच्याच नावावर एकमत झाले नाही.
दरम्यान, जिल्हा बँक कर्ज प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याने या दोघांची नावे मागे पडली. सुरेश धस यांना राज्यमंत्री केल्यानंतर लोकसभेसाठी त्यांना पालकमंत्री करा, या साठी तब्बल १५ दिवस दादा टीमने दबावाचे राजकारण खेळले. पण राजकीय समीकरणात पक्ष नेतृत्वाने पालकमंत्रिपदावरुन क्षीरसागरांना बदलण्यास नकार दिला. काही महिन्यांपूर्वी पवारांच्या दरबारात लोकसभेच्या उमेदवारीचा विडा उचलण्यास तयार असल्याचे धस यांनी जाहीर केले होते. मात्र, पक्षांतर्गत कोणी वरचढ होऊ नये, या साठी जिल्हा बँक प्रकरणात धस यांनीच पक्षाच्या नेत्यांचा ‘गेम’ केल्याचा आरोप उघडपणे होत असल्याने धस यांनाही आपला नारळ फुटू शकतो, असे वाटते. तसेच
खासदार होऊन पुढे काय, यामुळे धस यांचे कार्यकत्रेही लोकसभेसाठी उत्सुकता दाखवत नाहीत. परिणामी जिल्हय़ाच्या राजकारणात आपल्याला मुक्त स्वातंत्र्य मिळावे, म्हणून क्षीरसागरांना लोकसभेवर पाठवण्यास ‘दादा टीम’ उताविळ झाली आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा क्षीरसागर चांगली लढत देऊ शकतात, असा सूर दादा टीमच्या सर्वच दिग्गजांनी आवळला आहे.
क्षीरसागरांचे पांरपरिक विरोधक असलेल्या सर्वानीच क्षीरसागरांचे नाव पुढे करुन राजकीय हिशेब चुकता करण्याचा डाव टाकला. विरोधकांचे मनसुबे ओळखून क्षीरसागरांनीही निवडणूक लढवणार नसल्याचे नेतृत्वाला स्पष्ट केले असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपमध्ये असताना लोकसभेची उमेदवारी लढवली होती. मागच्या वेळी जि. प. सदस्य रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर तब्बल सव्वाचार लाख मते घेतली होती. पण पक्षांतर्गत राजकारणामुळे हे दोघेही आता निवडणुकीस उत्सुक नसल्याने ६ महिन्यांत अनेक बठका घेऊनही कोणीच निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचे पाहून अखेर अजित पवारांनी पक्ष उमेदवारी जाहीर करेल, मला रिझल्ट पाहिजे, अशा शब्दांत दम भरला आहे.
या पाश्र्वभूमीवर आगामी दोन दिवसांत राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता असल्याने ‘बळीचा बकरा’ कोण होतो, याकडे विरोधकांसह स्वपक्षीयांचेही लक्ष लागले आहे.
मुंडेंच्या विरोधात लढणार कोण?
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांची कोंडी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ वर्षांत विविध नेत्यांना सत्तेची रसद पुरवली.
First published on: 21-01-2014 at 01:55 IST
TOPICSगोपीनाथ मुंडेGopinath Mundeनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is against munde search of ncp