सोलापूर जिल्हय़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात मागील वर्षांत ११४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. परंतु पाणीवाटपाचे नियोजन साफ चुकल्यामुळे धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला. त्यास जबाबदार कोण, असा सवाल राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला.
करमाळा तालुक्यातील केम येथे ग्रामपंचायतीने ८० लाख खर्च करून उभारलेल्या विविध विकासकामाचे उद्घाटन मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रवीण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या समारंभास राज्य सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी उपाध्यक्ष भारत शिंदे, प्रा. राजेंद्र दास, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुकाप्रमुख महेश चिवटे आदी उपस्थित होते. केमचे सरपंच अजित तळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यंदाचा दुष्काळ अतिशय गंभीर स्वरूपाचा असताना त्यातच उजनी धरणाच्या पाणीवाटपाचे नियोजन साफ चुकल्यामुळे दुष्काळाची झळ प्रचंड प्रमाणात सहन करावी लागत असल्याचे नमूद करीत रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, गेल्या वर्षी ११४ टक्के भरणाऱ्या उजनी धरणात गेल्या २४ नोव्हेंबर रोजी १६ टक्के पाणीसाठा होता. नंतर त्यात वरचेवर घट होऊन आज धरणातील पाणीसाठा उणे १४ टक्क्यांपर्यंत खालावत गेला आहे. हे पाणी गेले कोठे? पाण्याचे नियोजन का चुकले? हे पाणी आता जूनअखेपर्यंत पुरणार काय, असे प्रश्न निर्माण झाले असून या नुकसानीची जबाबदारी कोणावर ठेवायची, असा सवाल त्यांनी केला. विजयसिंह मोहिते-पाटील हे यापूर्वी पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पुणे जिल्हय़ातून उजनी धरणात पाणी आणले होते. त्याप्रमाणे सध्याच्या भीषण टंचाईच्या काळातही पुणे जिल्हय़ातील भामा-आसखेड धरणातून दोन टीएमसी पाणी सोडता येऊ शकते. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची उपयुक्तता पटवून सांगताना ते म्हणाले, उजनी धरणाची पाणी साठवणूक क्षमता ११७ टीएमसी आहे. त्यापैकी ६४ टीएमसी पाणीसाठा मृतसाठय़ात मोडला जातो. म्हणजेच उर्वरित ५३ टीएमसी पाण्यावर नियोजन करावे लागते. प्रत्यक्षात मात्र या ५३ टीएमसी पाण्याच्या उपलब्धतेवरच नव्या व जुन्या मिळून ८० टीएमसी पाण्याच्या योजना कार्यान्वित होणार आहेत. याचाच अर्थ दरवर्षी आपणास पाण्याचा तुटवडा भासणार आहे. त्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना राबवून कुंभी-कासारी व कृष्णा नदीतून समुद्राला वाहून जाणारे पाणी भीमा खोऱ्यातून उजनी धरणात आणणे गरजेचे आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला होता. या प्रकल्पाच्या बाजूने त्यांचा पाठपुरावा आजही सुरूच आहे. त्यासाठी सर्वानी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन मोहिते-पाटील यांनी केले.