चंद्रपूरमधील नागरिक पेचात पडले
रस्त्यावर आलेले अतिक्रमण वाचवून निकृष्ट दर्जाची वेडीवाकडी आणि कामाच्या अंदाजपत्रकाला बगल देऊन सुरू असलेल्या नाली बांधकामाची तक्रार करणाऱ्या रहिवाशांनाच काम तर थांबवून बघा. मग मी दाखवतो, अशा शब्दात दम देणारे भद्रावती नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले हे प्रशासकीय अधिकारी की हुकूमशाह, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला न सुनावता रहिवाशांना सुनावल्याने त्यांचे त्या कंत्राटदाराशी अर्थपूर्ण संबंध असावे, अशी शंका येते. येथील गुरूनगर वॉर्डमधील ठेंगे प्लॉट येथे ५ लाख ७३ हजार रुपये खर्च करून नगर परिषद फंडातून सिमेंट कॉक्रीटच्या नालीचे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बांधकाम करण्यात येत आहे. हा रस्ता ३० फुट रुंदीचा आहे.
 या रस्त्यावर काही रहिवाशांनी अतिक्रमण करून घराची संरक्षण भिंत, जिना, बोअरिंग, ओटा तयार करून जवळपास तीन ते चार फूट रस्ता अतिक्रमित केला आहे. हे अतिक्रमण न काढता नगर पालिका नालीचे बांधकाम करत आहे. त्यामुळे नाली सरळ न येता वेडीवाकडी येत आहे. सत्ताधारी पक्षासमोर मिंधे झालेले मुख्याधिकारी सत्तापक्षाची मतपेटी खराब न व्हावी या उद्द्ेशाने हे अतिक्रमण न काढताच अशाप्रकारे नाली बांधकाम करत आहे.
येत्या सप्टेंबरमध्ये या नगर पालिकेची निवडणूक होत आहे. अतिक्रमण काढून बांधकाम केल्यास अतिक्रमणधारक रहिवासी नाराज होतील आणि त्याचा फटका सत्ताधारी पक्षाच्या मतपेटीला बसेल म्हणून मतांसाठी आंधळे झालेले मुख्याधिकारी मात्र अशा नाली बांधकामामुळे रस्त्याला सौंदर्य प्राप्त न होता विद्रुपता येईल याकडे दुर्लक्ष करत आहे. नगर परिषद क्षेत्रात अशी अनेक काम झाली असून काही ठिकाणी होत आहेत. ही बाब त्या ठिकाणचे रहिवासी बाबुराव एकरे, रमेश ठेंगे, मधुकर डुकरे, रवी इंगोले, तसेच इतर रहिवाशांनी मुख्याधिकारी डॉ.विजय इंगोले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी ज्याप्रकारे काम होत आहे तसेच होऊ द्या. जर ते थांबविण्याचा कुणी प्रयत्न केल्यास मी त्याला पाहून घेईल, अशा शब्दात दम दिला. याबाबत रहिवासी या कामाची तक्रार संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहेत, तसेच या अवैध बांधकामाविरुध्द न्यायालयात दाद मागणार आहेत.