लोकसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात दहाही जागांवर मिळालेले यश बघता आता विदर्भातून मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते? यावरून सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये आपापल्या नेत्यांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचे नाव मंत्रिमंडळासाठी जवळपास निश्चित झाले असून विदर्भातून आणखी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळाल्याने केंद्रात मंत्रिमंडळासाठी रस्सीखेच सुरू झाली असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेणे सुरू झाले आहे. विदर्भात अमरावतीमधून आनंदराव अडसूळ, यवतमाळमधून भावना गवळी, बुलढाणामधून प्रतापराव जाधव आणि चंद्रपूरमधून हंसराज अहीर या चारही मावळत्या खासदारांनी पुन्हा एकदा लोकसभेत प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या भावना गवळी या चौथ्यांदा लोकसभेत गेल्या असून त्या विदर्भातून विजयी झालेल्या एकमेव महिला आहे. आनंदराव अडसूळ यापूर्वी राज्यमंत्री होते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी राज्यमंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता असून  त्यादृष्टीने त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली असल्याची माहिती मिळाली. विदर्भातून प्रबळ दावेदारांची संख्या पाच ते सहा आहे. मात्र, त्यामधून कोणाला संधी मिळते याबाबत चर्चेला आता ऊत आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये असलेले नितीन गडकरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जा मिळणार हे निश्चित असले तरी त्यांच्याकडे कुठले खाते देणार हे मात्र अजूनही निश्चित नाही. महाराष्ट्रात चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुका बघता राज्यातील महायुतीच्या विजयी झालेल्या काही खासदारांना संधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्यात विदर्भातील किती खासदारांना मंत्रिमंडळात संधी मिळेल याबाबत साशंकता आहे. अकोलातून संजय धोत्रे तिसऱ्यांदा विजयी झाले. याशिवाय प्रफुल्ल पटेल सारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला भाजापचे नाना पटोले यांनी पराभूत केले आहे.
यूपीएचे सरकार असताना विदर्भातून प्रफुल्ल पटेल, मुकुल वासनिक आणि विलास मुत्तेमवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. मात्र निवडणुकीच्या पूर्वी मुत्तेमवार आणि वासनिक यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आल्यानंतर त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली होती. तिघेही कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते त्यामुळे भाजपने विदर्भाला किमान एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री द्यावे अशी वैदर्भीय जनतेची अपेक्षा आहे.
रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे सरचिटणीस आणि गांधी घराण्याचे जवळचे असलेले मुकुल वासनिक यांचा पराभव करून सेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड सर केला आहे. तुमाने प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. हंसराज अहीर चौथ्यादा लोकसभेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे ते सुद्धा मंत्रिमंडळात प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. यावेळच्या निवडणुकीत एकटय़ा भारतीय जनता पक्षाने २८३ जागी विजय मिळविला आहे. सत्तास्थापनेसाठी लागणारा जादूई आकडा भाजपने गाठला असला तरी त्यांना मित्रपक्षांना सामावून घ्यावे लागणार आहे. विशेषत: शिवसेनेच्या काही खासदारांना संधी अपेक्षित आहे, त्यामुळे कोणाची वर्णी लागते? याकडे वैदर्भीयांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा