‘तो’ वादविवादांचा बादशाह झाल्यामुळे बॉलिवूडवरची त्याची पकड अंमळ सैल झाली आहे हे खरे असले तरी त्याच्याबद्दल असणारी चाहत्यांची आणि इंडस्ट्रीची ओढ काही कमी झालेली नाही. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री विद्या बालननेही त्याला सगळ्यांसमोर तू ‘एसआरके’ आहेस हे विसरून चालायचे नाही, असे म्हटले होते. तेव्हाही तो मनोमन खूष झाला होता. आताही मन्नतवर ‘तो आनंदीआनंद गडे’ म्हणून बागडतो आहे पण, बाहेर त्याच्यासाठी म्हणून तीन-तीन जीव टांगणीला लागले आहेत.
त्याचे झाले आहे असे की रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’चे काम आटोपून शाहरूख खान मन्नतवर आला तोच सुट्टीचा विचार मनात घोळवत. आता ‘चेन्नई एक्सप्रेस’नंतर आपल्याला सुट्टीची गरज आहे, असे त्याला वाटते आहे. पण, तो मन्नतवर परतला हे कळल्याबरोबर फरहान अख्तर आणि त्याचा मित्र रितेश सिधवानी यांनी रात्री-अपरात्री तिथे बैठक मारायला सुरुवात केली आहे. फरहानला ‘डॉन ३’ चे काम सुरू करायचे आहे आणि आत्ता शाहरूख मोकळाच आहे म्हटल्यावर त्याच्या हातात पहिला चित्रपट ‘डॉन ३’ असावा, अशी फरहानची इच्छा असणे साहजिकच आहे. शिवाय, ‘डॉन’ म्हणजे थेट बिग बीशीच स्पर्धा. बघा तीन-तीन ‘डॉन’ करून दाखवले, असा टेंभा मिरवता येईल या कल्पनेनेच शाहरूख लगेच चित्रिकरणाला होकार देईल, असा फरहान आणि मंडळींचा अंदाज आहे. परत सशाला गाजराचे निमित्त तसे शाहरूखसाठी यात त्याची जीवश्चकंठश्च मैत्रिण प्रियांका चोप्राही आहे. तरी अजून ‘डॉन ३’ ला हिरवा कंदिल मिळालेला नाही.
त्यात रोहित शेट्टी आणि गँगबरोबर ‘चेन्नई एक्सप्रेस’ करून परतलेला शाहरूख रोहितच्या प्रेमातच आहे. त्यामुळे त्याने स्वत:च मी रोहितबरोबर आणखी दोन चित्रपट करणार असे जाहीर करून टाकले आहे. तर तिकडे त्याची जुनी मैत्रीण फराह खान शाहरूख यावर्षी तरी ‘हॅप्पी न्यू इअर’ला होकार देणार या अपेक्षेत आहे. फराहने आपल्या ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटासाठी कधीच एसआरकेला करारबध्द करून टाकले आहे. पण, पठ्ठय़ा हातात येईपर्यंत वर्ष सरताहेत. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या बादशाहला यावर्षी पदरात पाडून घेण्यासाठी तिघांचीही रस्सीखेच सुरू आहे.

Story img Loader