उद्या शुक्रवार नाही. पण तरीही दोन मोठे चित्रपट आणि दोन मोठे कलाकार रूपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिकीटबारीवर कोणाची आतषबाजी होणार अजय देवगणची की शाहरूख खानची? याकडे ट्रेड विश्लेषकांसह चित्रपटसृष्टीतील अवघ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘जब तक है जान’ चित्रपटाला तिकीटबारीवर मात देण्यात ‘सन ऑफ सरदार’ यशस्वी झाला तर यशराजची चित्रपटांच्या बाजारपेठेतली मक्तेदारी वगैरे मोडून निघेल. ट्रेड विश्लेषकांना मात्र हे दोन्ही चित्रपट १०० कोटीची दिवाळी करतील, असे वाटते आहे.
दिवाळीची तीन दिवसांची सुट्टी व त्याला जोडून शुक्रवार, शनिवार, रविवार असा संपूर्ण आठवडा या दोन्ही चित्रपटांच्या हातात आहे. ‘वीर झारा’नंतर तब्बल आठ वर्षांनी यश चोप्रांनी ‘जब तक है जान’ दिग्दर्शित केला. तोही कतरिना कै फ व अनुष्का शर्मा या दोन तुलनेने नवीन चेहऱ्यांना घेऊन. रोमँटिक चित्रपट, गुलजार यांची गाणी आणि ए. आर. रेहमानचे संगीत यामुळे खास यश चोप्रा शैलीतील प्रेमकथांची आवड असणारा प्रेक्षकवर्ग आपसूकच हा चित्रपट बघणार. त्यात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यश चोप्रांचे निधन झाल्याने सहानुभूतीचा स्पर्शही याला लाभला आहे. दुसरीकडे गेली दोन वर्षे ‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘बोलबच्चन’ सारख्या चित्रपटांनी आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या अजयचा स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग आहे. त्यातून अजयबरोबर सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, जुही चावला अशी तगडी स्टारकास्ट. पूर्णत: विनोदी चित्रपट या ‘सन ऑफ सरदार’च्या जमेच्या बाजू. अर्थात, त्यामुळे प्रेक्षकांसाठी कोणत्या चित्रपटाची निवड करायची हा मोठा कठीण प्रश्न आहे. दुसरीकडे प्रदर्शित होण्याआधीच थिएटरच्या वाटणीवरून यशराज फिल्म्स व अजय देवगण फिल्म्स यांच्यातील ‘आतषबाजी’मुळे हे दोन्ही चित्रपट तिकीटबारीवर कसा नफा कमावतात, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागलेआहे. यशराजच्या म्हणण्यानुसार, त्यांनी देशभरातील १०,५०० सिंगल स्क्रीन थिएटर्सपैकी केवळ १,५०० थिएटर्स घेतली आहेत.  ‘जब तक है जान’ परदेशातील ६५० थिएटरमधून तर ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटही परदेशातील ३५० थिएटरमधून प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे ‘सन ऑफ सरदार’चे कडवे आव्हान ‘जब तक है जान’ या चित्रपटाला आहे, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.