ही तालुक्यात दरोडा घालून मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अद्याप अटक न झाल्याने संतप्त नागरिकांनी कुही तालुक्यात काही वेळ बंद पाळला. विद्यार्थ्यांसह संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. कुही ग्रामपंचायतीसमोर नागरिकांनी दिवसभर ठाण मांडले होते. तणावपूर्ण वातावरण पाहता कमांडो व ग्रामीण पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री कुही तालुक्यातील नवरगाव, धानोली, दिपाला, चिंतापूर, तारणी परिसरात पाच ठिकाणी दरोडेखोरांनी दरोडे घातले. मारहाण करीत ऐवज लुटला. एका मुलीवर अत्याचार केला. पोलिसांनी याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले असले तरी दरोडेखोरांना अद्यापही अटक न झाल्याने नागरिक संतप्त आहेत. या घटनेच्या निषेधार्थ कुहीसह तालुक्यातील सर्व दुकानदारांनी सोमवारी सकाळी दुकाने उघडलीच नाहीत. त्यांनी बंद पाळला. कुही ग्राम पंचायतीसमोर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आस्तिक सहारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनंत खडसे, कुहीचे माजी सरपंच राजू येळणे, ईश्वर धनजोडे, पंचायत समिती सदस्य हरीश कडव, देवळीखुर्दचे माजी सरपंच दिलीप कुकडे, डोडमाचे सरपंच रमेश चरडे, राजू केदार, नंदू नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद हरडे, रिपाइंचे विलास चंदनखेडे, शिवसेनेचे रमेश रेहपाडे आदींसह नागरिक एकत्र आले. विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश होता. दुपारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, या घटनेने या परिसरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेकजण शेतावर गेलेच नाहीत. कुही तालुक्यातील नवरगाव, धानोली, दिपाला, चिंतापूर, तारणी परिसरात सुमारे दहा एकराचे अनेक फार्म हाऊस आहेत. त्यांचे मालक बहुतांशी नागपुरात राहणारे असून त्यांनी फार्म हाऊसच्या रखवालदारीसाठी शेतमजूर ठेवले आहेत. दरोडेखोरांनी मोठा माल मिळेल, या आशेने फार्म हाऊसवर दरोडे घातले. मात्र, रखवालदार व त्याचे कुटुंब तेथे होते आणि त्यांच्याजवळ फार काहीच नव्हते. एक-दोघांकडे सोन्याचे दागिने दरोडेखोरांना मिळाले.
दरोडेखोरांना प्रत्येकाला मारहाण केली. दोन जखमी कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेमुळे फार्म हाऊसमध्ये रखवालदारी करणारे मजूर व त्यांचे कुटुंब घाबरले असून ते गावातील घरात रहावयास गेले आहेत.  पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. मंत्री व इतर राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना राबावे लागले. पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदारसुधीर पारवे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, जिल्हा परिषदेचे माजी सिक्षण सभापती नागोराव जिभकाटे, माजी खासदार प्रकाश जाधव, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा जयदेव मजुमदार, काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष सुनीता गावंडे, तक्षशीला वाघधरे यांच्यासह अनेकांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. शासकीय योजनेतून शक्य तेवढी मदत करू, तरतूद नसल्यास स्वत: मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. पीडित मुलीच्या शिक्षण व लग्नाची जबाबदारी घेण्याचे अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी जाहीर केले.
पोलिसांनी चौकशी सुरू केली. जवळच्या एका फार्म हाऊसवर ओली पार्टी झाली. तेथे मद्य रिचवलेल्यांपैकी या घटनेत असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे.  पोलिसांनी त्या आधारे सुमारे ५० जणांची चौकशी केली.
पीडित मुलीने सांगितलेल्या आरोपीचे वर्णन व पार्टीत सहभागी एकाचे वर्णन जुळत असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. इतरांचा या घटनेत समावेश नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणातील आरोपींची माहिती मिळाली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ग्रामीण गुन्हे शाखेसह विविध पथके आरोपींच्या मागावर असून ते लवकरच हाती येतील. आरोपींनी दरोडे घालताना चेहऱ्यावर रुमाल गुंडाळले होते. त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जात आहे. त्यांचा आवाज तसेच बांधा या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. पाच संशयीत आरोपीेना ताब्यात घेण्यात आले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे, असे डॉ. शर्मा म्हणाले.  

Story img Loader