यंदाची दिवाळी तुम्ही कुणाबरोबर साजरी करणार? मित्रांबरोबर की कुटुंबाबरोबर? दिवाळीत तुम्ही फराळाची देवाणघेवाण करणार का? दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही मित्रांना फोन करणार, त्यांना भेटणार की फक्त मोबाईलवरून एसएमएस पाठवणार? या दिवाळीत तुम्ही नेमके काय करणार?, असे कोणी तुम्हाला विचारले तर तुम्ही म्हणाल, ‘अरे काय चाललंय काय? दिवाळी हाच मुळी आनंदाचा सण असतो. दिवाळीची खरेदी, पणत्या-कंदिलांची रोषणाई, रेखीव रांगोळ्या, सुगंधी उटण्याचा वास, दिवाळीच्या पहिल्या पहाटेची आंघोळ, फटाक्यांची आतषबाजी, मिठाई, ताटात दाटीवाटीने मांडलेले लाडू, चकली, करंज्यांचा फराळ, भावाला ओवाळल्यावर ताटात पडणारी ओवाळणी, सगळ्यांचे आनंदाने फुललेले चेहरे आणि स्नेहमिठी मारून मित्रांना दिलेल्या शुभेच्छा.. अशा कितीतरी आनंदाच्या गोष्टी ‘दिवाळी’ या एका शब्दात दडलेल्या असतात.’
महानगरातील वेगाने बदलत गेलेली जीवनशैली, नोकरी-व्यवसायामुळे दिवाळीतही न मिळणाऱ्या सुट्टया, कॉम्प्युटर-लॅपटॉप-टॅब्लेट आणि मोबाईलसारख्या अत्याधुनिक गॅझेट्समुळे सुट्टीच्या दिवशीही सुरू असणारे काम, शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने दूरदेशात करावे लागलेले वास्तव्य या सगळ्याचा परिणाम कुठेतरी देशातील मुख्य महानगरांमधील तरूण पिढीवर होतो आहे, असा निष्कर्ष ‘इपसॉस’ या मार्केट रिसर्च कंपनीने केलेल्या पाहणीतून निष्पन्न झाला आहे. दिवाळीच्या आधी घराची साफसफाई करून मंगलमय वातावरण निर्माण करणे, आकाशकंदिल बनवण्यापासून दाराबाहेर रांगोळ्या काढणे, पणत्या लावणे अशा कामांमध्ये लहानांनाही सामील करून घेणे, फराळासाठी आठवडाभर आधीपासून पदर खोचून एकत्र कामाला लागलेल्या आई, आजी, मावशी, काकू आणि मग हाच फराळ घेऊन दिवाळीच्या चार दिवसांत मित्र-नातेवाईकांच्या घेतलेल्या गाठीभेटी या सगळ्या गोष्टींमागे आपापसातले हेवेदावे विसरून एकत्र येणे हा महत्त्वाचा उद्देश होता. आता कामाच्या गडबडीत फराळ करायला वेळ नाही म्हणून तो बाहेरून विकत आणला जातो. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सगळ्यांना फोन आणि एसएमएस पाठवून शुभेच्छा दिल्या की उरलेले तीन दिवस घरी बसून दिवाळीचे कार्यक्रम टीव्हीवर पाहणे नाहीतर आराम करणे यावर लोकांचा भर असतो. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात ९१ टक्के लोकांसाठी दिवाळी म्हणजे खरेदी, फटाके, नवीन कपडे आणि मिठाई एवढय़ापुरतीच मर्यादित झाली आहे. तर ७७ टक्के लोकांना दिवाळीतली भेटवस्तूंची देवाणघेवाण महत्त्वाची वाटते तर ७७ टक्के लोकांसाठी घरातले रंगकाम किंवा नूतनीकरण ही दिवाळीतली मोठी गोष्ट वाटते. मात्र, आजही दिवाळी कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, अगदी कामाच्या ठिकाणी किंवा बाजूला रहायला आलेल्या नवीन लोकांबरोबरही साजरी करायला पाहिजे यावर सगळ्यांचे एकमत आहे. मुंबईसारख्या शहरात लोक बऱ्याच प्रमाणात आपल्या नेहमीच्या पानवाल्यापासून रोज कामावर जाताना रेल्वेत भेटणाऱ्या परिचितांबरोबर जोडले गेलेले असतात त्यामुळे दिवाळीसारख्या सणांमध्ये अगदी ८५ टक्के लोक शेजाऱ्यांना, ६४ टक्के लोक आपल्या सहकाऱ्यांना आणि जवळजवळ शंभर टक्के कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला भेट देणे, फराळ वाटणे या गोष्टी महत्त्वाच्या मानतात, असे या पाहणीत दिसून आले आहे.
या दिवाळीत तुम्ही कोणाला खूश करणार?
यंदाची दिवाळी तुम्ही कुणाबरोबर साजरी करणार? मित्रांबरोबर की कुटुंबाबरोबर? दिवाळीत तुम्ही फराळाची देवाणघेवाण करणार का? दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही मित्रांना फोन करणार, त्यांना भेटणार की फक्त मोबाईलवरून एसएमएस पाठवणार? या दिवाळीत तुम्ही नेमके काय करणार?,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-11-2012 at 11:58 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whom you want to do happy in this diwali