गोळीबार, खून, मारामारी, दरोडे, गँगवार हे संत्रानगरी नागपूरचे सध्याचे चित्र आहे. केवळ रात्रीच नाही, तर दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटना बघून नागपूरवर नियंत्रण नेमके कुणाचे, गुंडांचे की पोलिसांचे, असा प्रश्न भयभीत झालेल्या नागपूरकरांना पडला आहे.
सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेले हे शहर राज्याची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. सांस्कृतिक घडामोडींचे मोठे केंद्र अशीही या शहराची ओळख आहे. संत्र्यांच्या उत्पादनामुळे देशात प्रसिद्ध असलेल्या या शहराची ओळख आता नामचिन गुंडांनी बदलविण्याचा विडा उचलला आहे. गेल्या एक वर्षांपासून या शहरातील गुन्हेगारीत कमालीची वाढ झाली असून रोज घडणाऱ्या घटना सामान्यांच्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या अनिता बोरकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या महिलेने अन्नात भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला होता. अतिशय क्रुरपणे तिचा आवाज दाबण्यात आला. लालगंज परिसरात घडलेल्या या घटनेची चर्चा अजूनही आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात तेवढी तत्परता दाखवली. मात्र, असे गुन्हेच घडणार नाहीत, यासाठी पोलिस काय करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
गेल्या महिनाभरात नागपुरात गुंडांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नरेंद्रनगर परिसरात भरदिवसा दरोडा पडला. आईच्या मांडीवर असलेल्या सहा महिन्याच्या बाळाला चाकू लावून त्याच्या आजीची गला आवळून हत्या करण्यात आली. मोमिनपुरा परिसरात गोळीबार झाला. उमरेड रोडवर रोशन भुरेची हत्या झाली. हसनबागेत तिहेरी हत्याकांड घडले. पांढरबोडीत गुंडांच्या दोन टोळ्या आपसात भिडल्या. झिंगाबाई टाकळीत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यावर हल्ला झाला. या काही मोजक्या घटना आहेत. इतर घटनांची यादी बरीच मोठी आहे. या घटना बघून पोलिस नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या दीड वर्षांपासून नागपूरच्या आयुक्तपदाची जबाबदारी के.के. पाठक यांच्यावर आहे. त्यांना कुठेही आपला ठसा उमटवता आलेला नाही. कर्णधारच अपयशी ठरल्याने पोलिसांची अख्खी टीम गारद झाली आहे. या शहरातील एकाही ठाणेदाराचे त्याच्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण नाही. आला दिवस ढकलायचा याच वृत्तीने साऱ्या ठाणेदारांचे कर्तव्य बजावणे सुरू आहे.
मुळात या ठाणेदारांना शहराची ओळखच नाही. या ठाणेदारांचा प्रभावसुद्धा नाही. शहरातील अनेक ठाणी राजकीय वरदहस्ताचा वापर करून मिळवलेले अधिकारी येथे आहेत. त्यांना सर्वसामान्यांच्या भयाशी काहीही देणेघेणे नाही. आयुक्तच कचखाऊ असल्याने उपायुक्तांनासुद्धा कशाचे सोईरसुतक नाही. त्यामुळे पोलिसिंग म्हणावे, असे या शहरात कधीच काही घडतांना दिसत नाही. त्याचा फायदा गुंड व टगे घेऊ लागले आहेत. एकेकाळी मुंबई गँगवारसाठी प्रसिद्ध होती. तेथील गँगवार आता संपले. त्याची जागा आता हे शहर घेत आहे. या शहरात काम करून गेलेले अधिकारीसुद्धा हीच भावना बोलून दाखवतात. त्यामुळे या शहरावर नियंत्रण नेमके कुणाचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरातील पोलिस असेच सुस्तावलेले राहिले तर या हिंसक घटना प्रमुख मार्गावरसुद्धा दिसू लागतील, अशी भीती आता लोक बोलून दाखवू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा