मुळात शेतकरी अल्पभूधारक बनले आहेत. त्यांच्या जमिनीवर सिलिंग आणण्याचा सरकारचा विचार चालू आहे. शेतकऱ्यांसाठीच सरकार सिलिंग का आणत आहे, असा सवाल करून शेतकरी संघटना त्याला ठाम विरोध करणार असल्याची माहिती ब. ल. तामस्कर यांनी दिली.
औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथे १० डिसेंबर १९८६ रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने कापसाला भाव मिळावा, याकरिता आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात निवृत्ती कऱ्हाळे, परसरामजी कऱ्हाळे (डिग्रस कऱ्हाळे) व ज्ञानदेव टोमटे (सुरवाडी) या तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतीवर्षी त्या हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने डिग्रस कऱ्हाळे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, देविप्रसाद ढोंबळे, उत्तमराव वाबळे, पुरुषोत्तम लाहोटी, ज्येष्ठ विधीज्ञ अनंत उमरीकर, शिवाजी कऱ्हाळे, अंजली पातुरकर, सचिदानंद मोरे, भास्कर फटींग, खंडबाराव नाईक, अप्पराव सोळंके, प्रल्हादराव राखोंडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी ब. ल. तामस्कर पुढे म्हणाले की, शहरात अनेक उद्योजकांना कोटय़वधी रुपयांची घरे आहेत. त्यांची प्रचंड संपत्ती असतांना सरकार मात्र त्याला हात न लावता केवळ छोटय़ा शेतकऱ्यांविरुध्द सिलिंगचा कायदा आणू पाहात आहे. यामुळे अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांवर स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा संकट येऊ पाहात आहे. त्याला शेतकरी संघटना विरोध करणार असल्याचे तामस्कर यांनी सांगितले.

Story img Loader