मुंबईची लोकसंख्या, पालिकेचा अर्थसंकल्प, शिक्षण समितीचा अर्थसंकल्प याच्या तुलनेत कोचिन आणि त्रिवेंद्रम महापालिका खिजगणतीलाही नसताना तेथील शाळांची पाहणी करून मुंबई महापालिकेतील शिक्षण समिती सदस्य नुकतेच मुंबईत परतले.या दौऱ्यातील गमतीजमती सांगण्यासाठी शिक्षण समिती अध्यक्षांनी खास पत्रकार परिषदच आयोजित केली होती.
कोचीन महापालिकेचा अर्थसंकल्प केवळ १२५ कोटी रुपयांचा असून ७४ नगरसेवक आहेत. परंतु असे असतानाही नगरसेवकांना आपल्या प्रभागांमध्ये विकास कामे करण्यासाठी ४० कोटी रुपये निधी दिला जातो, असे सांगून विठ्ठल खरटमोल यांनी प्रशासनाला शालजोडीतील हाणला. केरळमध्ये सरकारी, विनाअनुदानित, सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या शाळा आहेत. मुंबईमधील शिक्षण समितीच्या सदस्यांनी कोचीनमधील १०० वर्षे जुन्या शाळेला भेट दिली. या शाळेच्या वर्गात आणि भिंतीवरील विविध पक्षी, प्राणी, महत्त्वाची माहिती इत्यादींच्या चित्रांवर सदस्यांचे लक्ष वेधले होते. त्रिवेंद्रम महापालिकेच्या शाळेत जाण्यासही हे सदस्य विसरले नाहीत. मात्र याच सदस्यांचे पाय मुंबईत मात्र पालिकेच्या शाळेत अभावानेच वळतात. महापालिका शाळेतील पटसंख्या सुधारणे, शिक्षकांचा दर्जा उचावणे याबाबत मात्र हे सदस्य कायम मूग गिळून बसतात. परंतु कोचीन आणि त्रिवेंद्रममधील पालिका शाळांचे सध्या हे सदस्य तोंड भरून कौतुक करीत आहेत. वास्तविक २६ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेची कोचीन आणि त्रिवेंद्र महापालिकेची तुलनाच होऊ शकत नाही. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २५०० कोटी रुपयांचा आहे. तर कोचीन महापालिकेचा सर्वसाधारण अर्थसंकल्प १२५ कोटी रुपये आहे. या बाबी लक्षात घेता या सदस्यांनी केरळ दौऱ्यात नेमका कसला अभ्यास केला असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा