शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न करत असतानाच शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते, याचा तसेच बी, बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके उत्पादन करणाऱ्या काही कंपन्यांचा बोगस धंदा शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन येथील दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक  मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी केले. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आत्महत्या करतात, पण नापिकीसाठी बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्याही जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.  
येथील दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलांना स्वावलंबी करण्यासाठी दिलेल्या मदतीच्या संदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हे विचार वक्त्यांनी व्यक्त केले. ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयाचे यवतमाळ जिल्ह्य़ाला कौतुक राहिलेले नाही. आत्महत्यांची आकडेवारी, कारणे, सरकारी पॅकेज वगरे विषयांवर सातत्याने चर्चा आणि आंदोलने सुरू असतात; परंतु आत्महत्या थांबत नाही. अशावेळी यवतमाळच्या दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांना जगण्याचा आत्मविश्वास देण्याचे जे कार्य सुरू केले त्याला तोड नाही. आतापर्यंत १२० शेतकरी विधवांना स्वयंपूर्ण करण्यात ‘दीनदयाल’ने जी भूमिका वठविली ती वृत्ती साऱ्याच समाजाने आत्मसात केली पाहिजे. घेणाऱ्यांनीही आता देणाऱ्याचे हात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा.न.मा. जोशी यांना केले. येथील तेजस्विनी छात्रावासात झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी वनिता भगवान पुडके, सुनीता गुणवंत जाधव, संध्या नरेंद्र बालक, सुनंदा सुभाष ढेंगे, विजया सुधीर पाढेन, सुरेखा राजेश चव्हाण, वंदना किसन बोतांवर या शेतकरी भगिनी, दीनदयालच्या नीलिमा मंत्री, प्रा. विजय गावंडे, मीरा घाटे, मीरा फडणीस, सविता कडू, साधना देव, शेलेश देशकर, पुनाजित कुळमेथे, सुभाष सगणे, तेजस्विनी छात्रावासाच्या माणि केंद्र, अंजली चौहान उपस्थित होत्या.
ते जोशी म्हणाले, संकटावर मात करण्यासाठी देवाने आपल्याला जन्माला घातले आहे, हे समजून या परिवारांनी धर्याने परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. नापिकीच्या, बोगस बियाणे आदी अन्य कारणांकडे दुर्लक्ष न करता त्यातही काम करण्याची गरज आहे.
याप्रसंगी दीनदयालच्या शेतकरी विकास प्रकल्पांतर्गत  कुटुंब आधार योजनेतील दत्तक परिवारापकी ७ लाभार्थी महिलांना अमेरिकेतील सेव्ह इंडियन फार्मर्स संस्थेतील भारतीयांच्या वतीने विविध व्यवसायांसाठी  अर्थसहाय्य केले आहे. नागपूरच्या वैनगंगा विकास संस्थेचे अध्यक्ष विनय कुऱ्हेकर, सचिव शशिकला दलाल, उपाध्यक्ष सुधीर देशपांडे, दीनदयालचे सचिव विजय कद्रे, रा.से. समितीच्या प्रांत कार्यवाहिका सुलभा गड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात लाभार्थी आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांनी संस्थेने मदत केल्याने आपल्या जीवनात कोणते बदल झाले ते सांगून लघुउद्योगातील अनुभव मांडले.
या कार्यक्रमाची मांगलादेवी (ता. नेर) येथील सुनंदा सुभाष ढेंगे यांनी बहुउद्देशीय पीठगिरणी देण्यात आली. प्रारंभी गजानन परसाडकर यांनी कुटुंब आधार योजनेची पाश्र्वभूमी विषद केली. संस्थेने शेतकरी आत्महत्याग्रस्त गावांमध्ये सर्वेक्षण करून या कुटुंबांना आर्थिक, भावनिक, शैक्षणिक अशा कोणत्या मदतीची गरज आहे ते जाणून घेतले. त्यातूनच १२० कुटुंबांना दत्तक घेण्याची योजना आली. त्यांना त्यांच्या आवड व गरजेनुसार शेतीपूरक उद्योग, शेळीपालन, पीठगिरणी, कापड दुकान इत्यादी व्यवसाय थाटून दिले आहेत.
रत्नाकर कडू व शरद देव यांनी स्वागत केले. वैनगंगा संस्थेचे विनय कुऱ्हेकर यांनीही मनोगतात दीनदयालच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कार्याची प्रशंसा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा