मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तब्बल ३० ते ३३ टक्के रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा फटका बसलेल्या प्रवाशांना आता पुन्हा एकदा असा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मात्र त्या वेळी एवढी जबरदस्त भाडेवाढ करणाऱ्या रिक्षा टॅक्सी संघटनांना आता भाडेवाढीची गरजच काय, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या अरेरावीला आणि सततच्या भाडेवाढीला वैतागलेल्या प्रवाशांना आता पुन्हा एकदा भाडेवाढ नको आहे, हेच यातून ध्वनित होत आहे. मात्र रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची आपली मागणी सोमवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर वाढल्यानंतर अधिक तीव्र केली आहे.ऑक्टोबर २०१२मध्ये भाडेवाढ करताना किमान भाडे रिक्षासाठी १२ रुपयांवरून थेट १५ रुपयांवर नेण्यात आले. त्याचप्रमाणे किमान अंतर ऑक्टोबर २०१२च्या आधी १.६ किलोमीटर एवढे होते. ते १.५ किलोमीटर एवढे करण्यात आले. टॅक्सीच्या बाबतीत किमान भाडे १६ वरून १९ एवढे केले होते. त्यामुळे त्या वेळी रिक्षा-टॅक्सी चालकांची पाचही बोटे तुपात होती. त्याहीवेळी आम्हाला कोणीच विचारात न घेतल्याची तक्रार प्रवासी करतात. किमान अंतर १.५ किलोमीटर करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात बऱ्याचदा मीटरमध्ये १.५ हा आकडा पडण्याआधीच भाडे वाढल्याचे दिसते. हीदेखील फसवणूक असून त्याचा हिशोब या रिक्षा-टॅक्सी संघटनांनी प्रवाशांना द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.सध्या सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. आधी सीएनजी ३४ रुपये किलो होता, त्या जागी तो ३६ रुपये किलो झाला आहे. हा काही रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा फटका नाही. सीएनजीच्या दरातील ही वाढ फार जास्त नसल्याने एवढय़ा लवकर रिक्षा-टॅक्सी यांच्या भाडय़ात वाढ करण्याची गरज नाही, असेही या प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.मात्र भाडेवाढीबाबत रिक्षा-टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या असून सोमवारच्या सीएनजी दरवाढीनंतर ही वाढ लवकर व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनच्या क्वाड्रोस यांनी या भाडेवाढीमुळे टॅक्सीचालकांना मोठा फटका बसणार असल्याची कबुली देत किमान भाडे १९ रुपयांवरून २२ रुपये करण्याची मागणी केल्याचे सांगितले. तसेच त्यापुढे प्रत्येक किलोमीटरसाठी सध्या १२.३५ रुपये आकारण्यात येतात. त्या ऐवजी १४.३८ रुपये देण्याची मागणीही त्यांनी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे केली आहे.
दुसऱ्या बाजुला मुंबई महानगर प्रदेश परिसरातील रिक्षांची भाडेवाढही त्वरीत व्हावी, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने केली आहे. आम्हाला हकीम समितीने दिलेले कोष्टक मंजूर आहे. या कोष्टकात विविध घटकांचा समावेश आहे. त्यातील इंधन या घटकात सीएनजीचे सध्याचे दर टाकून येईल, ती भाडेवाढ करण्यास आमची हरकत नाही, असे संघटनेच्या शशांक राव यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा