साधारणत: तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट. धरणातील संथ पाण्यात एकाने दगड भिरकावला अन् त्याचे केवळ तरंगच नाही तर अक्षरश: सुनामीसारख्या लाटा उसळल्या. राजकीय क्षेत्रात भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू होते, अर्थातच नाशिक. राज्यातील धरणांची जबाबदारी सांभाळणाऱ्या जलसंपदा विभागाचा ‘कारभार’ चव्हाटय़ावर आल्यामुळे प्रसारमाध्यमेही कारभाऱ्यांवर अक्षरश: तुटून पडली. अर्थात, तो विषयच गंभीर अन् पाण्याच्या रुपाने दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने कोणी कसलीच तमा बाळगली नाही. अवघ्या काही महिन्यांपूवी शहरातील समस्त पत्रकार मंडळी ज्या जलसंपदा विभागावर आसूड ओढत होती, त्यांना त्याच विभागाच्या प्रमुखांकडून गौरविण्याचा अलौकिक सोहळा नाशिक नगरीत भरगच्च वातावरणात पार पडला. या अद्भूत सोहळ्याची संकल्पना नाशिक जिल्हा पत्रकार संघाची.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविले जाते. नाशिक जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी पत्रकारांच्या अनेक संघटना असून त्यात काही संमिश्र तर काही केवळ मुद्रीत तर काही केवळ वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसाठी कार्यरत आहेत. त्यातील नाशिक जिल्हा पत्रकार संघाशी बहुसंख्य सभासद जोडलेले असल्याने आणि या संघास अनेक दिग्गज पत्रकारांचा वारसा लाभल्याने त्यांचे कार्य नेहमीच ठळकपणे अधोरेखीत झाले आहे. यंदा पत्रकार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळाही त्यास अपवाद ठरला, असे म्हणता येणार नाही. परंतु त्याचे कारण आजवरच्या तुलनेत विपरित होते. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (मेरी) प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी)चे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी जलसंपदा विभागाचे अंतरंग उलगडले आणि स्थानिक पत्रकारांचे लक्ष पांढरे व या संस्थेकडे गेले. धरणांच्या कामातील अनियमितता, निधी नसताना राजकीय स्वार्थापोटी कामांना दिली जाणारी मान्यता, अंदाजपत्रक वाढविण्यासाठी लढविल्या जाणाऱ्या क्लुप्त्या अशा अनेक विषयांवर सखोलपणे प्रकाशझोत टाकला. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. याच विषयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला. या विभागाची धुरा सांभाळणाऱ्या मनसबदारांवर आरोप-प्रत्यारोप झाले. याच कारणावरून शासनास श्वेतपत्रिका काढणे भाग पडले. या सर्व घटनाक्रमाचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना वादग्रस्त ठरलेल्या जलसंपदा विभागाच्या अवाढव्य कारभाराची जाणीव झाली. असे एक ना अनेक संदर्भ असताना आणि उपरोक्त वार्ताकनाशी स्थानिक पत्रकार मंडळींचा अतिशय निकटचा संबंध आला असताना संघाने पत्रकारांना गौरविण्यासाठी या विभागाच्या मंत्र्यांची निवड का केली, याचे कोडे काही उलगडू शकले नाही.
तीन महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाच्या कारभारावर स्थानिक पत्रकारांनी प्रकाश टाकलेला असताना पत्रकार संघाने त्याच विभागाच्या मंत्र्यांना आमंत्रित केले. मंत्र्यांनीही सलग दोन वर्ष या सोहळ्यास उपस्थित राहता न आल्याची कसर यंदा भरून काढण्याचे मान्य केले. दोन वर्षांत असे काहीही घडले नव्हते की, मंत्र्यांना नाशिकच्या प्रसारमाध्यमांचे महत्व लक्षात यावे. अतिशय व्यस्त कार्यक्रमातून आपण आवर्जुन या सोहळ्यास उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाचा योग भाषणाच्या निमित्ताने जुळून आला. सरकारला ताळ्यावर आणण्याचे काम प्रसारमाध्यमांचे आहे. परंतु, त्याचा अर्थ असा नव्हे की, शासन सर्वच काम चुकीचे करते. शासनाकरवी अनेक विधायक कामेही केली जातात. कधीकधी अमलबजावणीत किंवा व्यक्ती व्यक्तीमध्येही मतभेद असू शकतात, असा दाखला त्यांनी बोलण्याच्या ओघात देऊन टाकला. त्यावेळी ते नेमके का आले, याचाही काही जणांना उलगडा झाला. पत्रकार संघाने केवळ प्रमुख पाहुण्यांची निवडच नव्हे, तर कार्यक्रमाचे स्थळ ठरविण्यात पत्रकार संघाने वेगळेपण अधोरेखीत केले. त्यामुळे काहिशा दाटीवाटीत अन् अधुनमधून बंद पडणाऱ्या ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या साक्षीने जलसंपदा मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांना सन्मानित करण्याचा हा सोहळा अवर्णनीय ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why sangha gets this type of friendships
Show comments