पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांच्या कारवाईवरून तापलेल्या वातावरणात आमदारांनी महापौर कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापौरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या दालनात आयुक्तांवर तुफान शेरेबाजी करत आमदारांनी एकप्रकारे महापौरांच्या पदाचे अवमूल्यन केल्याचे मानले जात आहे.
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या अनधिकृत बांधकामविरोधी मोहिमेला आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांनी तीव्र विरोध केला आहे. शहरातील विकासकामे ठप्प झाल्याचे सांगत पाडापाडी थांबवा व कामांकडे लक्ष द्या, असा सूर त्यांनी आळवला आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयीची बैठक होईपर्यंत पालिका सभा घेणार नाही, असा पवित्रा आमदारांनी मागील आठवडय़ात घेतला. महापालिकेत येऊन त्यांनी महापौर दालनात पत्रकार परिषद घेतली. महापौर कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी आमदारांनी आयुक्तांवर बोचऱ्या शब्दात टीका केली. वास्तविक त्यांना पत्रकार परिषदेसाठी अन्य ठिकाण निवडता आले असते. मात्र, त्यांनी महापौर दालनाचा वापर केल्याने तो एक टीकेचा विषय झाला आहे. महिलांना आरक्षण द्या, त्यांना पदे द्या, काम करताना स्वातंत्र्य द्या, अशी भाषा भाषणांमध्ये वापरायची आणि प्रत्यक्षात महिला पदाधिकाऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जाते.

Story img Loader