*  शिवसैनिक संभ्रमित
*   नव्या-जुन्या गटांमधील वाद टोकाला
एकेकाळी शिवसेनेला राज्यात सत्ता प्राप्त करून देण्यात महत्वपूर्ण ठरलेल्या राज्य अधिवेशनातील अनेक घडामोडींचे साक्षीदार असलेले शहर कार्यालय सध्या शिवसेनेतील अंतर्गत यादवीच्या वावटळीत सापडले आहे. हे कार्यालय नेमके कोणाचे, हा वाद आता सुरू झाला असून कार्यालयाचा ताबा जुन्या पदाधिकाऱ्यांनी घेत समांतर पद्धतीने संघटनेचे काम सुरू केल्यानंतर माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचे वृत्त येऊन धडकल्यानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
या वृत्तास सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याच पदाधिकाऱ्याने अधिकृतपणे दुजोरा दिला नाही. विद्यमान जिल्हाप्रमुखांनी आपणांस काहीही माहिती नसल्याचे सांगून कानांवर हात ठेवले तर असा निर्णय झाला असल्याची आपणास माहिती नसून असे उद्योग केवळ खा. संजय राऊत हेच करू शकतात असे
सांगत बागूल यांनी कार्याध्यक्ष परदेशातून येईपर्यंत आपण कोणताही निर्णय घेणार नसल्याचे नमूद केले. या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवरील हा वाद शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून नव्या गटाने जुन्या गटाच्या मोहऱ्याला जायबंदी करण्याची खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात
सुरू आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा बाहेर पडली. माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल व दत्ता गायकवाड, माजी महानगरप्रमुख अर्जुन टिळे यांच्यासह शिवसैनिकांनी एकत्र येत या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व गटनेते अजय बोरस्ते यांच्याविरोधात तोफ डागली. नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा वाद धुमसत आहे. त्याची परिणती पक्षाची अवस्था बिकट होण्यात झाली असताना त्याचे कोणाला सोयरसूतक नसल्याचे वारंवार दिसून आले. जनसेवेच्या कामावरून या दोन गटांमध्ये वाद होण्याऐवजी नवीन वादात पक्षाचे शालिमार येथील कार्यालय लक्ष्य ठरले. जुने पदाधिकारी व शिवसैनिकांनी कार्यालयाचा ताबा घेऊन समांतर पद्धतीने कामकाज सुरू केले. सेनेत सरळसरळ जुने व नवे असे दोन गट असून नव्या गटातील पदाधिकाऱ्यांना कार्यालयात येऊ न देण्याचा इशारा जुन्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. पक्ष कार्यालय हे जुन्याच गटाचे असल्याचा दावा माजी जिल्हाप्रमुख बागूल यांनी केला.
विद्यमान जिल्हाप्रमुख करंजकर व इतर नवे पदाधिकारी पक्षाच्या कामासाठी कधीही कार्यालयात येत नव्हते. अपवादात्मक परिस्थितीत यावे लागले तर ते गुपचूपपणे येत असत. इतर वेळी त्यांचे काम बोरस्ते यांच्या पंडित कॉलनी वा बडगुजरांच्या सिडको कार्यालयातून होत असे, असेही त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर इमारतीतील तीन वेगवेगळे गाळे मिळून शिवसेनेचे हे कार्यालय आहे. त्यातील प्रत्येकी एका गाळ्याची खरेदी माजी महापौर विनायक पांडे, शिवा पालकर व आपल्या नांवे असल्याचे नमूद करत त्यांनी वेगळ्याच वादाला तोंड फोडले.
विद्यमान जिल्हाप्रमुख करंजकर हे ३० वर्षांपासून शिवसैनिक असतानाही त्यांना विरोध करण्याचे कारणही बागूल यांनी त्यांच्या खास शैलीत दिले. करंजकर हे ‘डमी’ जिल्हाप्रमुख असून बडगुजर यांच्या तालावर ते नाचतात, अशी खिल्ली उडविली. जिल्हाप्रमुखाची निवड स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून झालेली नाही. बडगुजर यांनी मुंबईतील नेत्यांशी संधान साधून करंजकर यांना या पदावर बसविले. पक्ष संघटनेचे काम त्यांच्याकडून केले जात नाही, असा आरोपही बागूल यांनी केला. जुन्या गटाकडून एका पाठोपाठ एक आरोप सुरू असताना दुसऱ्या गटाने मात्र कोणतीही आक्रस्ताळी भूमिका न घेता संयम दाखविल्याचे दिसत आहे. बोरस्ते यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तर, जिल्हाप्रमुख करंजकर यांनी सेना कार्यालय हे कोणा एकाची मालमत्ता नसल्याचे सांगत हे संघटनेने उभारलेले वैभव असल्याचे नमूद केले. या ठिकाणी आम्ही कसे जायचे ते ठरवू, असेही ते म्हणाले. या गटातील तिसरे घटक बडगुजर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान अचानक बागूल यांना शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त येऊन धडकले. मात्र त्यास अधिकृतपणे दुजोरा मिळू शकला नाही. विद्यमान जिल्हाप्रमुखांनी आपणाकडे असा निर्णय झाल्याची माहिती नसल्याचे नमूद केले तर बागूल यांनीही तसेच सांगितले.
पक्षातून हकालपट्टीसारखा उद्योग खा. राऊत हेच करू शकतात. कार्याध्यक्ष सध्या परदेशात असल्याने ते येईपर्यंत आपण कोणताही निर्णय घेणार नाही. त्यांच्याकडे दाद मागू आणि शिवसेना सोडण्याचा आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही, असे बागूल यांनी नमूद केले. खा. राऊत यांनी नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेची पुरती वाट लावली असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घडामोडींमुळे नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांमधील वादाला वेगळेच वळण लागल्याचे स्पष्ट
झाले आहे.

Story img Loader