मनोरंजन आणि प्रबोधनाद्वारे रसिकांच्या जाणीवेच्या कक्षा रुंदाविण्याचे काम ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार’ करत आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी नुकतेच विलेपार्ले येथे केले.
उत्तुंग सांस्कृतिक परिवार या संस्थेच्या १८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्तुंग सांस्कृतिक पुरस्कार’ वितरण सोहोळ्यात ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बावीस श्रुतींवर अभ्यास करणारे डॉ. विद्याधर ओक, गुरू-शिष्य परंपरा लाभलेले पं. सुरेश तळवलकर, त्याग, प्रेम आणि निष्ठा जपत आदिवासींसाठी काम करणाऱ्या सुरेखा दळवी यांच्यासारखी व्यक्तिमत्वे या जगात आहेत, म्हणूनच जगाचा तोल सांभाळला जात असल्याचे सांगून संगोराम म्हणाले की, पगार किती मिळणार किंवा वाढणार याचा विचार न करता जनसेवेत स्वत:ला विसरून जाणाऱ्या या व्यक्ती म्हणजे संत आहेत, असे संगोराम म्हणाले.
आपले मनोगत व्यक्त करताना सुरेखा दळवी म्हणाल्या की, शहरात आणि आदिवासी पाडय़ावर राहणाऱ्या या लोकांच्या जीवनात आजही खूप मोठी दरी असून याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्या प्रत्येकाला जी मदत करता येईल, ती करण्याचा प्रयत्न करावा. डॉ. विद्याधर ओक यांनी भारतीय संगीतातील २२ स्वर आणि युरोपीयन १२ स्वर यांच्याबद्दल तौलनिक विचार व्यक्त केले. या २२ श्रुती ज्या तानपुऱ्यावर स्थापन केलेल्या आहेत, तो तानपुरा गुरू व शिष्य नव्हे तर स्वरांची जादू जाणून घेणारा कोणीही संगीतप्रेमी तो वाजवू शकतो, असे सांगितले तर पं. तळवलकर म्हणाले की, गुरू-शिष्य परंपरेतही नवता अपेक्षित असते. शास्त्र, तंत्र शिकल्यानंतर त्या गोष्टी आणि मी पणा विसरता आला पाहिजे. गुरूच्या मनातही शिकविण्याची कला आणि इच्छा असली पाहिजे. आपला शिष्य आपल्या पुढे जावा, असेच गुरूला वाटले पाहिजे.
पुरस्कार वितरणानंतर आदित्य ओक, सत्यजित प्रभू, प्रसाद पाध्ये, प्रभाकर मोसमकर, मंदार गोगटे यांनी ‘जादुची पेटी’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री लेले यांनी तर पुरस्कार वितरण सोहोळ्याचे सूत्रसंचालन समीरा गुजर-जोशी यांनी केले. पुरस्कार वितरण सोहोळ्याअगोदर सत्यजित तळवलकर आणि मुकुंल डोंगरे यांनी तबला आणि ड्रम्सची जुगलबंदी सादर केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा