आपला पती दारू पिऊन आपणास सतत मारहाण करतो म्हणून विष्णूनगर पोलीस ठाण्यात एका पत्नीने आपल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी त्यानुसार नवऱ्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्याचे काळधंदे उघड झाले. या प्रकरणात डोंबिवलीत पंडित दीनदयाळ रस्त्याला राहणारा इंद्रवदन पटेल (वय ५७) याला अटक करण्यात आली आहे.
विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रवदन यांची पत्नी पोलीस ठाण्यात नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार दाखल करण्यास आली होती. या प्रकरणात इंद्रवदनला चौकशीसाठी बोलविले असता त्याचे काळेधंदे उघड झाले. शहरातील अनेक जैन संस्था गोरगरीब व्यक्ती, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रूपाने आर्थिक मदत करतात. या शिष्यवृत्ती लाटण्यासाठी इंद्रवदनने बोगस शिधापत्रिका तयार केली होती. एका बँकेत गोपाळजी शहा नावाने खाते उघडले होते. जैन संस्थांकडून गरिबांना मिळणारी मदत इंद्रवदन लाटून तो बँकेतील बोगस खात्यावर जमा करीत होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून इंद्रवदन पटेल हा धंदा करीत होता. इंद्रवदनने किती संस्थांची फसवणूक केली आहे, किती गैरव्यवहार केला आहे याची चौकशी सुरू आहे, असे साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घाडगे यांनी सांगितले.

Story img Loader