आधुनिक तंत्रज्ञानाचे जसे काही फायदे असतात, तसे काही तोटेही. सिन्नर बस स्थानकात अलीकडेच उपलब्ध झालेली वायफायची सुविधा हे त्याचे ठळक उदाहरण. प्रवासी व तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच बस स्थानकात वायफाय झोनची संकल्पना सिन्नर येथे मूर्त स्वरुपात आली. तथापि, अवघ्या दहा ते बारा दिवसात या अत्याधुनिक व्यवस्थेचे तोटे समोर येत आहेत. सकाळपासून महाविद्यालयीन युवक-युवतींबरोबर काही टवाळखोरांचे जत्थे स्थानकात ठाण मांडून बसतात. या व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्यांची ही मांदियाळी प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवीन डोकेदुखी ठरली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, सिन्नर बस स्थानकातील वायफाय झोनच्या सुविधेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांनी या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला. नाशिक-पुणे व नाशिक-शिर्डी मार्गावरील सिन्नर शहरातील हे बस स्थानक आधीच अत्याधुनिक पध्दतीने विकसित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी वायफाय सेवा उपलब्ध करण्यामागे युवा वर्गाला साद घालण्याचा प्रयत्न लपून राहिला नाही. काही दिवसांपूर्वी कार्यान्वित झालेल्या या सुविधेकडे युवा वर्ग आकर्षित होणे स्वाभाविकच होते. घडलेही तसेच. या व्यवस्थेचा युवा वर्गाला लाभ होत असला तरी वायफाय झोनचा बसस्थानकाला कितपत फायदा झाला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सध्या बहुतांश युवा वर्ग ‘स्मार्ट फोन’वर व्हॉट्स अप, चॅटींग, विविध प्रकारचे ऑनलाईन खेळ यामध्ये मग्न असतो. त्यासाठी इंटरनेट जोडणी महत्वाची असते. स्थानक परिसरात ‘वाय-फाय’द्वारे ही जोडणी प्रत्येकाला मोफत स्वरुपात उपलब्ध होते. त्यासाठी कोकाटे यांनी आपल्या आमदार निधीतून स्थानकाच्या दोन एकर क्षेत्रात ही व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी निधी खर्च केला आहे. ही व्यवस्था कार्यान्वित झाल्यानंतर बसस्थानकावर विद्यार्थी, युवक यांची गर्दी मोठय़ा प्रमाणावर होण्यास सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात, दुपारी १२ ते तीन आणि सायंकाळ या कालावधीत विद्यार्थ्यांसह टवाळखोर मुले, अन्य युवकांची या ठिकाणी गर्दी होते. इंटरनेट सेवा नि:शुल्क मिळत असल्याने चॅटींग, ऑनलाईन खेळ, व्हॉट्सअप यासह काही माहिती, गाणे, व्हिडीओ डाऊनलोड करून घेण्यासाठी अनेकांचा या ठिकाणी राबता आहे. स्थानक परिसरात प्रवाशांसाठी अद्ययावत अशी आसन व्यवस्था आहे. मनोरंजनासाठी १० हून अधिक एलईडी लावण्यात आले आहेत. या शिवाय एफएम चॅनेल सुरू असते. स्वच्छ कॅटींग सुविधा आहे. या सर्व सुविधेचा लाभ प्रवाशांपेक्षा विद्यार्थी आणि टवाळखोर अधिक घेत असल्याचे दिसते. या गर्दीमुळे परिसरात गोंधळाने प्रवाशी त्रस्तावले आहेत. वायफाय सेवेचा लाभ घेण्यात मग्न असलेल्यांना टोकल्यावर संबंधितांकडून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास मागे पुढे पाहिले जात नाही. बसस्थानक सार्वजनिक परिसर असल्याने या ठिकाणी कोणाला मज्जाव करता येत नाही. यामुळे एसटी महामंडळाची स्थिती ‘सहनही होत नाही अन् सांगता येत नाही’ अशी झाली आहे.
दुसरीकडे, महाविद्यालयीन युवकांचे वर्ग महाविद्यालयाऐवजी जणू या स्थानकावर भरतात. नव्या सुविधेमुळे वर्गात अनेकदा सामूहिक दांडी मारली जाते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून इंटरनेटचे व्यसन त्यांना जडत असल्याची तक्रार प्रा. शेख यांनी केली.