‘मध्य भारतातील रानम्हशींच्या संवर्धनाकरिता एक कृती आराखडा तयार करणे’ या विषयावरील तीन दिवसीय कार्याशाळेचे सोमवारी रामदासपेठेतील हॉटेल तुली इम्पॅरियलमध्ये उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रधान मुख्य वनसंरक्षक आलोककुमार जोशी होते. याप्रसंगी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एम.के. रंजीतसिंह, आययूसीएनचे डॉ. जेम्स बर्टन, महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक एस.डब्ल्यू.एच. नकवी, सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. सक्सेना उपस्थित होते. नकवी यांनी उपस्थित सर्व प्रतिनिधींचे स्वागत करून कार्यशाळेची रूपरेषा मांडली, तर डॉ. एम.के. रंजीतसिंह यांनी मध्य भारतातील रानम्हशींच्या संवर्धनाच्या आवश्यकतेवर भर दिला. डॉ. जेम्स बर्टन यांनी रानम्हशींच्या संवर्धनाशी संबंधित सर्व तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग आणि आययूसीएनच्या कृती आराखडय़ाबाबत माहिती दिली. किशोर रिठे यांनी मध्य भारतात आढळणाऱ्या रानम्हशींच्या संख्येबाबत प्रकाश टाकला. वनबल प्रमुख ए.के. जोशी यांनी वन्यप्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी त्यांच्या अधिवासाची सुरक्षितता अबाधित ठेवण्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम येथील वरिष्ठ वनअधिकारी, शासकीय तसेच अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी व प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तांत्रिक सत्रात भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे डॉ. एस.के. खंडुरी यांनी रानम्हशींच्या संवर्धनामधील भूमिका व या कार्यक्रमासाठी देय असलेल्या अर्थसह्य़ाच्या शक्यतेबाबत माहिती दिली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे रविकिरण गोवेकर यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्य़ातील कालामार्का येथील वनक्षेत्रात आढळणाऱ्या रानम्हशींच्या संख्येबाबत माहिती दिली. आययूसीएनचे प्रतिनिधी मार्क स्टॅन्ले प्राईस यांनी कृती आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत मत व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा