जिल्हा परिषदेतील सत्तेच्या आघाडीतून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसला सत्तेत वाटा देण्यासाठी आदेशाची प्रतीक्षा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीतील नेत्यांनी त्यादृष्टीने जिल्हय़ातील पदाधिका-यांकडे चाचपणी सुरू केल्याचे समजले. त्यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही काँग्रेसच्या पक्षीय वर्तुळात काय हालचाली होतात याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूक एकत्रित आघाडी करूनच लढवण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसमध्ये जवळपास झाला आहे. दोन्ही काँग्रेसने काही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप, सेना व इतर काही स्थानिक आघाडय़ांना स्वतंत्रपणे बरोबर घेतले आहे. हा प्रयोग नगर जिल्हा परिषदेतही झाला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजप, सेना, कम्युनिस्ट व अपक्षांना सत्तेत सहभागी करून घेत आघाडी केली आहे.
गेल्या महिन्यात दोन्ही काँग्रेसच्या राज्यपातळीवरील समन्वय समितीच्या सभेत हा विषय उपस्थित झाला होता. लोकसभा निवडणूक दोन्ही काँग्रेस एकत्र आघाडी करून लढवणार असल्याने या निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेसने भाजप व सेनेबरोबर सत्तेसाठी केलेल्या आघाडय़ांना काडीमोड देण्याचा निर्णय या समितीच्या सभेत झाला. काही दिवसांपूर्वी नगर मनपाच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी नगरमध्ये आलेल्या पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी समितीने असा निर्णय घेतला असला तरी त्याबाबत राष्ट्रवादीने अद्याप तसा आदेश दिलेला नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र त्याचवेळी पक्षातील श्रेष्ठींनी पालकमंत्र्यांसह जिल्हय़ातील काही पदाधिका-यांशी चर्चा करत नगर जि.प.च्या सत्तेतून भाजप-सेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसला सहभागी करून घेतल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची माहिती घेतल्याचे सांगितले जाते. याची माहिती आता सदस्यांपर्यंत पोहोचल्याने पुढे काय हालचाली होतात याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाला आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी नगर जि.प.मध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी अचानकपणे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेत त्यांच्या कार्यपद्धतीवर आरोपांचा भडिमार केला. परंतु काँग्रेसचे हे आंदोलन तेवढय़ाच अचानकपणे अनाकलनीय कारणांसाठी मागेही घेतले गेले. त्याचबरोबर गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनीही नगरमध्ये बैठक घेत जिल्हय़ात आगामी काळात दोन्ही काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचे सूतोवाच केले. या बैठकीस आदिक यांचे काँग्रेसमधील समर्थकही उपस्थित होते. या दोन्ही घटना नगर जि.प.मधील संभाव्य हालचालींच्याच निदर्शक असल्याचे मानले जाते. या सर्व घडामोडींना एका जबाबदार पदाधिका-याने दुजोराही दिला.
राजीनामा की अविश्वास?
भाजप-सेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतल्यास उपाध्यक्षपदासह दोन समित्या की केवळ दोन समित्या द्यायच्या यावरही खल सुरू झाला आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे (भाजप) व कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे (सेना) यांनी राजीनामा देणे किंवा त्यांच्यावर अविश्वास आणणे असे दोनच पर्याय आहेत. दोघेही राजीनाम्यास नकार देण्याचीच शक्यता अधिक आहे. अविश्वास पारीत होण्यासाठी महिला सभापतीमुळे तीनचतुर्थाश (७५ टक्के) व तांबे यांच्यावरील अविश्वासासाठी दोनतृतीयांश (६७ टक्के) संख्याबळ लागेल, असे चौकशी करता समजले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा