संकटात सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी ‘आईस’(इन केस ऑफ इमर्जमॅन्सी) हे सॉफ्टवेअर अधिक सुलभ करता येईल का, या दिशेने चाचपणी सुरू केली आहे. सध्या ही सुविधा अ‍ॅण्ड्रॉईड फोनवर उपलब्ध असली तरी साध्या मोबाईल फोनवरही ती कार्यान्वित होईल का या दिशेने प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई पोलिसांच्या सायबर सुरक्षा सप्ताहाचे निमित्त साधून ही यंत्रणा कार्यान्वित केली गेली असली तरी ती फक्त अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल फोनधारकांनाच वापरता येत आहे. साध्या मोबाईल फोनधारकांना मात्र या यंत्रणेचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु मुंबई पोलिसांचा हा उपक्रम चांगला असल्यामुळे तो इतर फोनसाठीही लागू व्हावा, अशी मागणी केली जात आहे. या प्रणालीचा अधिकाधिक महिलांनी वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले आहे. त्याचवेळी ही यंत्रणा अधिक सुलभ कशी करता येईल, त्याचा वापर सर्रास कसा होईल हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी काही उपाय योजता येतील का, या दिशेनेही प्रयत्न सुरू केल्याचे डॉ. सिंग यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले. या प्रणालीचा सर्वाना वापर व्हावा या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सहआयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी सांगितले. ही प्रणाली कार्यान्वित करताना अडचणी येत असल्याच्या काही तक्रारी असून त्याचीही आम्ही दखल घेतली आहे. संबंधित तज्ज्ञांमार्फत या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय आहे हा ‘आईस’
आईस म्हणजेच इन केस ऑफ इमर्जन्सी – संकटाच्या वेळी मोबाईल फोनवरील विशिष्ट बटन दाबले की तुमच्या ओळखीच्या १० व्यक्तींना एकाच वेळी अलार्म जाईल. त्यांना क़ळू शकेल की, तुम्ही संकटात आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ग्लोबल पोसिशनिंग सिस्टम म्हणजेच जीपीएस प्रणालीही असल्यामुळे तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात याचीही माहिती मिळू शकेल. मुंबई पोलिसांच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट मुंबईपोलीस डॉट ऑर्ग या वेबसाइटवर उजव्या कोपऱ्यात ‘सायबर सेफ्टी मन्थ’ अशी चौकट आहे. त्यावर क्लिक केल्यावर ही प्रणाली कशी डाऊनलोड करायची याची माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा