परभणी जिल्ह्य़ाचे पालकमंत्रिपद काँग्रेसला द्यावे, तसेच परभणी लोकसभेची जागा पक्षाकडे घ्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला ‘योग्य वेळी पाहू’ असे उत्तर मिळाले. जिल्ह्यातील काँग्रेस लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीत अजूनही एकमत होत नसल्याने हे पद काँग्रेसकडे द्यावे, यापूर्वी परभणीचे पालकमंत्रिपद काँग्रेसकडेच होते, याकडे परभणीतील काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह महापालिकेचे विरोधी पक्षनेते भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, शिवाजी भरोसे, श्याम खोबे आदींचा शिष्टमंडळात सहभाग होता. त्याआधी शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना सह्याद्री अतिथीगृहावर भेटले. परभणी लोकसभेची जागा काँग्रेसला सोडवून घ्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या बाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ‘बघू, पाहू’ असे होते. नजीकच्या काळात काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बठक घ्यावी, असेही शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. या बठकीच्या माध्यमातून राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या परभणी जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे नेत्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून ही बठक घ्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. सांगली महापालिका निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या दोन्ही बडय़ा नेत्यांशी चांगला संवाद झाला, असे शिष्टमंडळातील सहभागींनी सांगितले.
गोरक्षणाची शासकीय जागा, जलकुंभ व शासकीय निवासस्थानासाठी द्यावी, राष्ट्रीय महामार्ग २२२ विकसीत करण्यास निधी द्यावा, शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेस मदत करावी, भूमिगत गटार योजनेस निधी मिळावा, घनकचरा व्यवस्थापन, अल्पसंख्याक क्षेत्र विकास, पर्यटन विकास, दलितवस्ती सुधार योजना, महापालिकेची प्रशासकीय इमारत आदी कामांसाठी निधी द्यावा, स्थानिक संस्था कराची भरपाई मिळावी, शहर भारनियमनमुक्त करावे आदी मागण्यांचे निवेदन या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.